मुंबई : मराठा आंदोलकांचा आरक्षणासाठीचा लढा आणखी तीव्र होताना दिसत आहे. आंदोलक मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा आंदोलकांकडून राज्यातील काही भागातील लोकप्रतिनिधींची घरे-कार्यालये पेटविल्याची घटना घडली आहे. याच मराठा आरक्षणावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे अशी मागणी सत्ताधारी आमदाराने केली आहे. त्यामुळे विधीमंळडाचे विशेष अधिवेशन घेऊन त्यात मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढून केंद्र सरकारकडे पाठवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाला आता उग्र रूप प्राप्त झाल्याचं दिसत आहे. राज्यभरात मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. यातच सरकारने अनेक मंत्री आणि आमदारांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे. तर सत्तापक्षातील एक आमदार आणि खासदारांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यातच आता सत्तापक्षात असलेल्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.

मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे पत्र लिहून ही मागणी केली आहे. याच मागणीसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनीही याआधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. अमोल मिटकरी यांनी पत्रात लिहिलं आहे की, ”मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी संविधानिक गांधी मार्गाने जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहेत. आज ६ वा दिवस आहे. त्यानी प्राण पणाला लावले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सरकारने मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर जस्टीस शिंदे यांच्या अहवालानुसार मुख्यमंत्री यांची पत्रकार परिषदेमध्ये “कुणबी” अशी नोंद असलेल्या लोकांना प्रथम टप्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे सरकार आरक्षण देण्याच्या बाजुने सकारात्मक पाऊले उचलत आहे, याचे समाधान आहे, मात्र मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे त्याला वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण देण्याबाबत सरकारने पाऊले उचलणे गरजेचे आहे. यासाठी चर्चा घडवून आणण्याकरिता अतितात्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे असे मिटकरी यांची मागणी आहे.

मराठा आंदोलक आक्रमक, बीडमध्ये संचारबंदी लागू

मुख्यमंत्री शिंदे आणि राज्यपाल बैस यांच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा आरक्षणावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात राज्यपालांना याची माहिती देण्या संदर्भात भेट घेत असल्याची माहिती मिळत आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि आवारातील वाहनांना आग लावण्याची घटना आधी घडली.

राज्यातील विविध भागात जाळपोळच्या घटना घडू लागल्या आहेत. सोळंके यांचे वाहन जाळल्यानंतर मराठा आंदोलकांनी माजलगाव येथील नगरपरिषदेची इमारत जाळली. दुसरीकडे औरंगाबद जिल्ह्यातील भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड तेथील काही मराठा आंदोलांनी केलीय. राज्यातील मराठा आंदोलक संतप्त झालेले असताना मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचा आणि शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.

खासदार, आमदारांचे राजीनामे

भाजप खासदार हेमंत पाटील यांनी काल राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ आता बीडच्या गेवराई मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.तसंच काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. खासदार हेमंत पाटील यांनी काल आंदोलनस्थळी राजीनामा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *