२६ ऑक्टोबर, मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज धुळे दौर्यावर होते. मुंबईतील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती. ती भेट कॉफीसाठी होती, त्यात मविआबद्दल चर्चा झाली नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दुसरीकडे काल अकोल्यात अजित पवार समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी देखील त्यांची भेट घेत चर्चा केली होती. अकोल्यातील कालचा कार्यक्रम संपल्यानंतर प्रकाश आंबेडकर आज धुळे जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. या दौर्यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर त्यांचा निर्णय जाहीर केला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत आपण पुन्हा एकदा लोकसंग्रामच्या माध्यमातून धुळे शहरात काम करणार असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले होते.
मात्र, आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली असून त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी गेले काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आपण लोकसंग्राम या आपल्या पक्षाच्या माध्यमातून काम करणारा असल्याचे जाहीर केले होते.
राष्ट्रवादी मधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपण राजीनामा दिला असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले होते. मात्र, आज त्यांनी धुळे जिल्हा दौर्यावर असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांची शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यांच्याशी काही मिनटे बंद दाराआड चर्चा केली, दरम्यान अनिल गोटे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक विविध चर्चांना उधाण आले असून त्यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.दरम्यान, माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गेल्या काही वर्षांमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे.