मुंबई : शिवसेनेच्या फुट पडल्यानंतर सलग दुस-यावर्षी  दोन दसरा मेळावे होत आहेत. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा आझाद मैदानात मेळावा हेात आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरेंच्या तोफा धडधडणार आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.  त्यामुळे मैदान कोण मारणार ? याकडे राज्याचे लक्ष वेधले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (ठाकरे) चे दोन स्वतंत्र मेळावा होत आहेत. यंदाचे हे दुसरे वर्ष असून दोन्ही कडून मेळावा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.  टीझरच्या माध्यमातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दोन्ही मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे मुंबईवर ताण पडणार आहे. वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुमारे १२ हजार पौलीस तैनात आहेत.   

 मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरी मुंबई आमचीच, असे उद्धव ठाकरेंकडून ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, विधानसभा अध्यक्षांची यासंदर्भातील भूमिका, समाजवादी पार्टी आणि कम्युनिस्टांशी केलेल्या युतीबाबत विरोधकांनी सातत्याने केलेल्या टिकेला प्रत्युत्तर, मराठा आरक्षण, कंत्राटी भरती आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांचा दसरा मेळाव्यातील भाषणातून ठाकरे समाचार घेण्याची शक्यता आहे. सेनेत फूट पडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंवर सुरुवातीपासूनच चौफेर टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे शिंदेच्या टीकेचे बाण ठाकरेंवर असणार आहेत. त्याचबरेाबर सरकारची कामगिरी, मराठा आरक्षण  आणि मुंबईकरांसाठी काही घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांच्या भाषणांकडे राज्याचे लक्ष वेधले आहे. 

मुंबईत भगवे वातावरण

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणारे  मोठ मोठे फलक लावण्यात आले आहेत. ठाण्यापासून मुंबईतील कानाकोपऱ्यापासून नाका नाक्यावर भगवे झेंडे, भगव्या पताका आणि बॅनरबाजीमुळे वातावरण भगवेमय झाल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *