ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे टेंभीनाका येथील नवरात्रौत्सवात आनंद दिघे अष्टमीला आरती करायचे. हा क्षण आनंद दिघे यांची ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटात भूमिका करणार्‍या कलाकार प्रसाद ओक आणि इतर कलाकारांच्या उपस्थितीत रविवारी टेंभीनाका येथील नवरात्रौत्सवात देवीच्या मंडपात शूट करण्यात आला.

दोन वर्षांपूर्वी आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर महाराष्ट्रात प्रत्येक सिनेमागृहांवर हाऊसफुल्लच्या पाट्या पाहायला मिळाल्या होत्या.

आनंद दिघे यांनी ठाण्यात शिवसेना कशी वाढवली, मराठी माणसाला कसे लढायला शिकवले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिघे यांच्यातील गुरु-शिष्याचे नाते हे सर्वकाही चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते.

आता चित्रपटाच्या आगामी भागात दिघे यांच्या जीवनातील आणखी विविध घटना उलघडल्या जाणार आहेत. रविवारी नवरात्रौत्सवाच्या अष्टमीनिमित्ताने आयोजित सोहळ्यात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांच्या वेशात गर्दीतून एन्ट्री मारून आलेल्या भक्तांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार व शाखाप्रमुख निखिल बुडजडे उपस्थित होते.

आनंद दिघे यांनी जय अंबे मॉ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या नवरात्रौत्सवात त्यांच्या हस्ते आरती व्हायची. यांच्या हस्ते होणार्‍या अष्टमीच्या आरतीची आठवण जुणे जाणते ठाणेकर आजही सांगतात. तोच प्रसंग प्रसादने जिवंत करत दिघे यांच्या आनंदाश्रमातून दिघे यांच्याच ‘आरमाडा’ गाडीतून टेंभी नाक्यावर एन्ट्री घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *