मुंबई: मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अगदी कसारा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जतपर्यंतच्या प्रवाशांना सहन करावा लागतो.

मुंबईमध्ये नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना वेळेचे गणित पाळणे अत्यंत महत्त्वाचे असले, तरी वेळापत्रकातील गाड्या दररोज दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे नियोजित वेळेत इच्छितस्थळी पोहचणे प्रवाशांना अशक्य होते. विशेष म्हणजे एका मिनिटाच्या विलंबामुळे विमानतळ आणि काही कंपन्यांमध्ये प्रवेश नाकारला जात असल्यामुळे प्रवाशांचे वेळापत्रकच बिघडून जाते.

ठाणेपलीकडच्या कल्याण-कसारा आणि कर्जतपर्यंतच्या स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा अनुभव नित्याचा आहे.
कल्याण-कसारा-कर्जत दरम्यानच्या स्थानकांमधील अंतर अधिक असून या भागात लोकल गाड्यांची संख्याही अपुरी आहे. कसारा, कर्जत आणि खोपोली स्थानकांतून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना अत्यंत मोजक्या गाड्या असल्या, तरी त्या गाड्याही दररोज विलंबाने धावतात.

कल्याण स्थानकावर येईपर्यंत कोणतीही गाडी वेळ पाळते असे नाही, परंतु त्यानंतर पुढील प्रवासात वेळ पाळण्याचा प्रयत्न केला जातो. कल्याणला येईपर्यंतच वेळापत्रक बिघडल्यामुळे पुढील वेळापत्रक बिघडलेले राहते. त्यामुळे मुंबईतील एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लोकल गाडीचे नियोजन करून प्रवास सुरू केला, तर ठरलेल्या वेळेच्या एक ते दीड तास उशिराने पोहोचण्याची शक्यता निर्माण होते.

विमानतळावर विमान पकडण्यासाठी जाणाऱ्यांना त्यामुळे मोठा फटका बसल्याचे सातत्याने समोर येत आहे. परिणामी अनेकजण आधीची लोकल पकडण्याचा प्रयत्न करतात. तरी गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने त्याचाही फटका बसतो. लोकल विलंबामुळे नोकरी, व्यवसायवरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *