मुंबई : मराठा समाज आजही शांत आहे. मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नका. सरकारला हात जोडून विनंती आहे, आता सहन करण्याची क्षमता राहिली नाही. त्यामुळे पुढील दोन दिवसात निर्णय घ्यावा. सरकारने ३० दिवस मागितले होते, आम्ही ४० दिवस दिले. मात्र तरी आरक्षण मिळणार नसेल तर २५ ऑक्टोबरनंतर सरकारला झेपणार नाही पेलवणार नाही असं आंदोलन करु असा इशारा देत मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी पक्षातील मंत्री, राजकीय नेत्यांना गावबंदी करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.

“२५ तारखेपासून राज्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात मराठा समाज एकत्र येऊन कँडल मार्च काढणार असून सर्व गावांमध्ये साखळी उपोषण, आंदोलने करु असेही जरांगे पाटील यावेळी सांगितले. दोन टप्पे पाडल्याशिवाय न्याय मिळणार नाही. सुरुवातीला हे सरकारला सोपं वाटत असेल पण ते झेपणार नाही,” असा इशारा जरांगे पाटलांनी यावेळी दिला.

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटमही संपत आल्याने ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे यांनी म्हटलं की, शिंदे समिताचा अहवाल सरकारने पुढील दिवसात सादर करावा. आता समितीने वेळ मागू नये आणि सरकारनेही त्यांना वेळ देऊ नये. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक पुरावे उपलब्ध आहेत. राजकीय इच्छाशक्ती असेल तर पुराव्यांचीही गरज नाही. पुरावे गोळा करण्याच्या नावाखाली वेळकाढूपणा करुन नका. मराठ्यांनाही सगळं कळतंय. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

सरकारने आमचेच लोक आमच्या विरोधात उतरवलेत, पण आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. सरकारने आरक्षण घेऊनच गावात यावे असेही जरांगे पाटील म्हणाले. यापुढे कोणीही मराठा समाजाच्या बांधवाने आत्महत्या करू नका असे आवाहनही त्यांनी केले.

EWS जाहिरातीचं नव पिल्लू …

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज एकवटला असताना सरकारने ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये दिली आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध.. असा उल्लेख या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान या जाहिरातीवरुन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. “सरकारने ईडब्ल्यूएसच्या जाहिरातीमधून नवीन पिल्लू बाहेर काढले आहे. मात्र आम्हाला तात्पुरती मलमपट्टी नको, कायमचा इलाज पाहिजे. आम्ही मागितलेले सरसकट आरक्षण द्या..” अशा शब्दात जरांगे पाटील यांनी या जाहिरातीवर टीका केली आहे. या जाहिरातीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *