तरूणांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे गरजेचे
शिवनलिनी संस्थेचे अध्यक्ष अनिरूद्ध कुलकर्णी यांचे प्रतिपादन
डोंबिवली :– बहुतांश तरुण आज समाजकार्यात सहभाग घेत असून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे आणि ती जबाबदारी सामाजिक संस्थांनी पार पाडावी असे प्रतिपादन शिवनलिनी संस्थेचे अध्यक्ष अनिरूद्ध कुलकर्णी यांनी केले. कल्याण तालुका विधी सेवा समिती मार्फत सामाजिक कार्यात योगदान देणार्या विधी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा शिवनलिनी प्रतिष्ठानमार्फत आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
आजचा तरूण हा देशाचे भविष्य आहे. तरूणांमध्ये समाजबांधिलकी निर्माण व्हावी, तसेच तरुणांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थित लोहमार्ग विभागाचे विधी अधिकारी अँड.प्रदीप बावस्कर यांनी विधी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले. वकिली क्षेत्रात समाजाशी जास्त संपर्क येतो. त्यामुळे हे क्षेत्र सामाजिक कार्यात उतरण्यासाठी उत्तम क्षेत्र असल्याचे बावस्कर यावेळी म्हणाले. पिडीतांना, गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी विधी अभ्यासकांनी व वकिलांनी निस्वार्थ प्रयत्न करावेत असेही ते यावेळी म्हणाले. देवजीभाई हरिया विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी विनायक आभाळे व निलेश कुंभार यांनी विधी सेवा समिती मार्फत केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा प्रतिष्ठानतर्फे यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपा नगरसेवक तथा डोंबिवली ग्रामिण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील हे होते. कार्यक्रमात सहभागी अँड.सतिश सोनावणे यांनी यावेळी विधी शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. भाजपा नगरसेवक तथा डोंबिवली ग्रामिण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील हे कार्यक्रमाच्या प्रमुख पदी होते. मात्र तातडीच्या मंत्रालयातील कामामुळे त्यांना कार्यक्रमात थांबता आले नाही. त्यांनी य़ावेळी देवजीभाई हरिया विधी महाविद्याविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिवनलिनी प्रतिष्ठानच्या कल्याण ग्रामिण विभाग अध्यक्षपदी विधी विद्यार्थी रोहन टोके यांची निवड करण्यात आली.
अतिशय लाजिरवाणीगोष्ट आहे. एकीकडे सुधारणांचा डंका पिटायचा आणि दुसरीकडे गोरगरीब मागसलेल्या तरुणांच्या शिक्षणाचे मार्ग बंद करून अन्याय करायचा … अशा सरकारचा जाहीर निषेध