कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
डोंबिवली : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर याच भागातील दोन जणांनी कट करून लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणातील एक आरोपी सुमीत संजय लोथ याला संगमेश्वर पोलिसांनी अटक केली होती. जानेवारीमध्ये हा गुन्हा घडल्यापासून ९ महिने फरार असलेल्या एका आरोपीला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळच्या उंबार्ली गावातील एका चाळीतील घरातून बुधवारी पहाटे अटक केली.
प्रेम एकनाथ शिंदे (२१) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा संगमेश्वर तालुक्यातील रहिवासी आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर तो फरार झाला होता. तेथून तो डोंबिवली जवळ असलेल्या उंबार्ली गावातील मंदाधाम चाळीत लपून राहत होता. अल्पवयीन तरूणीच्या तक्रारीवरून सदर लैंगिक अत्याचार प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून संगमेश्वर पोलिस आरोपीला गेल्या ९ महिन्यांपासून शोधत होते. मात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.
कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोना सचीन वानखेडे यांना संगमेश्वर तालुक्यात लैंगिक अत्याचार करून तेथून पळून आलेला एक आरोपी डोंबिवली जवळील उंबार्ली गावातील एका चाळीत लपून राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांना दिली. मिळालेल्या माहितीप्रमाणे वरिष्ठ निरीक्षक पवार, उपनिरीक्षक संजय माळी, हवा. सचीन वानखेडे, अनुपम कामत, विश्वास माने, बापूराव जाधव, विजेंद्र नवसारे, विनोद चन्ने यांनी बुधवारी उंबार्ली गाव हद्दीत सापळा लावला. फरार आरोपी प्रेम एकनाथ शिंदे याला अटक केली. त्याने संगमेश्वर तालुक्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहभागाची कबुली पोलिसांना दिली. अटक आरोपीला संगमेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.