डोंबिवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. पदाला न्याय देता येत नसल्याने हा राजीनामा दिल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिल्याची माहिती थरवळ यांनी दिली. असे असले तरी मी शेवट पर्यंत शिवसैनिकच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर कल्याण जिल्हा प्रमुख पदासाठी सर्वात जुना चेहर म्हणून ज्येष्ठ शिवसैनिक थरवळ यांच्याकडे पाहिले जाते. येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत डोंबिवलीतून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील प्रखर नेतृत्व कस असावं हे थरवळ यांच्या पक्षातील कामकाजवरून दिसून येत. पक्षाचे दोन गट झाल्यानंतर थरवळ हे डोंबिवलीत झालेल्या एका राजकीय कार्यक्रमात ढसाढसा रडले होते. थरवळ यांनी एकीकडे जिल्ह्याचे नेतृत्व तर दुसरीकडे पक्ष वाढीसाठी दिलेला जोर हा शिवसेना ठाकरे गटाला पक्ष मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. आता थरवळ यांच्या जिल्हा प्रमुखाच्या राजीनाम्यानंतर ठाणे जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. दरम्यान पक्ष प्रमुख ठाकरे हे थरवळ यांचा राजीनामा स्वीकारतील की पुन्हा त्यांची समजूत काढतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पक्ष वाढीसाठी ठाणे जिल्ह्यात थरवळ यांचा चेहरा महत्त्वाचा असल्याने त्यांच्या या राजीनाम्या मूळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. असे असले तरी शेवट पर्यंत शिवसैनिकच राहीन असे त्यांनी सांगितले.