कल्याण : कल्याणच्या पूर्व भागातील पुना लिंक रस्त्यावर एका रिक्षा चालकाने भरधाव वेगात, निष्काळजीपणे रिक्षा चालवून एका विजेच्या खांबाला जोरात धडक दिली. या धडकेत रिक्षात मागे बसलेला एका प्रवासी खांबाच्या दिशेने फेकला गेला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी रिक्षा चालक बबलू रामलाल पवार (४०) याच्या विरुध्द प्रवाशाच्या पत्नीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. रिक्षाचालक बबलू हा वरप गावात राहतो. तर मयत रामेश्वर भोंगड (३८) हे आपल्या कुटुंबासह उल्हासनगर जवळील आशेळे गावात राहत होते.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, आरोपी बबलू पवार आणि मयत रामेश्वर भोंगड हे मित्र होते. शुक्रवारी रात्री कल्याणमधील कामे उरलकल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले. बब्लुच्या रिक्षेत रामेश्वर पाठीमागील आसनावर बसले होते. बब्लु वेगाने रिक्षा चालवित असल्याने रामेश्वर त्याला हळू रिक्षा चालविण्यास सांगत होता. परंतु बबलूने वेगाने रिक्षा चालवत असताना पुना लिंक रस्त्यावर त्याचे रिक्षेवरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा एका विजेच्या खांबाला जोराने धडकली. या धडकेत पाठीमागील आसनावर बसलेला रामेश्वर रिक्षातून बाहेर फेकून खांबावर आदळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रिक्षा रस्त्याच्या कडेला उलटी झाली. या धडकेत रामेश्वरचा मृत्यू झाला. बबलूने निष्काळजीपणे रिक्षा चालविल्यामुळे रामेश्वरचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रामेश्वरची पत्नी दुर्गाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रिक्षा चालका विरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!