अनिकेत कोथळेच्या खुन्यांना कडक शासन करा
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली कुटूंबियांची भेट
सांगली : सांगली येथे पोलीस कोठडीत झालेल्या माराहणीत मृत्यू पावलेल्या अनिकेत कोथळे यांच्या कुटूंबियांची मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज भेट घेतली. अनिकेतच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह परस्पर जाळून विल्हेवाट लावणा-यांना कडक शासन करा अशी मागणी नांदगावकर यांनी जिल्हाधिकारी कळम पाटील यांची भेट घेऊन केली.
अनिकेतला पोलिस कोठडीत मारहाण त्यात झालेला मृत्यू आणि त्यानंतर मृतदेहाची लावलेली विल्हेवाट या सगळया प्रकरणामुळे खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सांगली पोलीस चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अनिकेतच्या खुन्यांना शिक्षा करावी अशी मागणी सर्वत्रच होत आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जिल्हाधिकारी कळम पाटील यांची भेट घेतली. राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा, सांगली पोलीस उपनिरीक्षक दिपाली काळे यांच्यावर तक्रार नोंदवून त्यांची चौकशी करावी, ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड उज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून नेमणूक करावी. कोथळे कुटूंबियाला भरीव आर्थिक मदत द्यावी व अनिकेत यांच्या पत्नीस शासकीय नोकरी द्यावी त्यांच्या मुलीचा भविष्यातील शैक्षणिक खर्च शासनाने उचलावा आदी मागण्या नांदगावकर यांनी केल्या.