Ajit Pawar questioned on 4 months food bill on Cm Eknath Shinde Bunglow

ठाणे ( अविनाश उबाळे ) : महायुतीच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असे विचारले असता पवार यांनी याबाबत म्हणाले की मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच ठरवतील हे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री शिंदे यांचे असून ते राज्याचे प्रमुख असल्याने तेच पुढील मंत्रिमंडळ विस्तारा बाबत अंतिम निर्णय घेतील असे सांगून अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बोट दाखवत मंत्रिमंडळ विस्तारा बाबत सस्पेन्स कायम ठेवत यावर अधिक बोलणे सोयिस्करपणे टाळले.

शहापुरातील दिवंगत राजकीय नेते दशरथ तिवरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी शहापुरात आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक आमदार दौलत दरोडा यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी दरोडा यांच्याशी बंद दाराआड जवळपास अर्धातास अजित पवार यांनी राजकीय घडामोडीवर चर्चा केली.

महाराष्ट्रातील महायुती सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार हा प्रचंड चर्चेचा विषय असून सध्या शिंदे गटातील अनेक इच्छुक आमदारांना मंत्री पदाचे वेध लागले आहेत. महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवार गटाला देखील आणखी मंत्रीपद व महामंडळ हवी आहेत.

हा रखडलेला मंत्रिमंडळ व महामंडळ विस्तार दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दिल्लीत या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांच्याशी सविस्तर याबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होईल असे सांगण्यात येत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारा बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मंत्रिमंडळ विस्तार करतील अशी भुमिका मांडत विस्ताराबाबत विचारलेल्या मुख्य प्रश्नांला बगल देत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सावध भूमिका घेतली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले लवकरच शहापूर तालुक्यातील चोंढे, घाटघर, नगर या मार्गावरील रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागणार असून या रस्त्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत यावेळी आमदार दौलत दरोडा, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला, किसन तारमळे, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊ गोंधळे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना तारळे, शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे, युवा अध्यक्ष सुरज चव्हाण,भाऊ दरोडा, करन दरोडा आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने अजित पवार गटातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *