चेंबूर वाशी नाका परिसरात घरच नको रे बाबा ! 

वाहतूक कोंडीचे रोजचेच चक्रव्युह : वाहतूक पोलिसांचीही पाठच  

मुंबई : रस्ता अडवून बसणारे फेरीवाले, बिनदिक्तपणे रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवलेली वाहने आणि त्यात भरीस भर म्हणून बेशिस्त वाहनचालकांमुळे झालेली अवजड वाहनांची गर्दी असे दररोजचे चित्र चेंबूर वाशी नाका परिसरात पाहावयास मिळते. वाहतूक कोंडीचे चक्रव्युह भेदूनच इथल्या नागरिकांचा दिनक्रम सुरू हेातो. आरसीएफ पोलीसही केवळ बघ्याचीच भूमिका घेताना दिसतात. त्यामुळे चेंबूर वाशी नाका परिसरात घरच नको रे बाबा, अशी उद्विग्न भावना इथल्या रहिवाशांची झालीय.

वाशी नाका परिसरात इंदिरा नगर, पटेल नगर, शंकर देऊळ, गडकरी, म्हाडा कॉलनी, राहुल नगर, नागाबाबा नगर, खडी मशीन, मुकुंद नगर आणि स्थलांतरित रहिवाशांचा म्हाडा कॉलनी परिसर येतो. या भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. या मार्गावरून ये-जा करताना घर गाठणे शाळकरी मुले आणि नोकरदार, वाहनधारकांसाठी तारेवरची कसरत करावी लागते. रोजच्या कसरतीला इथले नागरिक कमालीचे वैतागले आहेत. तसेच बेशिस्त वाहनचालकांमुळे शालेय विद्यार्थ्यांचे तसेच नागरिकांचे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र बहुतांश वर्दळीच्या या परिसरात एकही वाहतूक पोलीस नसतो. सकाळ, दुपारी शाळेच्या वेळेत या मार्गावर वाहतूक पोलीस नसल्याने बेशिस्त वाहनचालकही उलट-सुलट मार्गाने वाहने हाकतात. अनेकदा या वाहनचालकांच्या गुंडगिरी आणि दादागिरीचा सामनाही रहिवाशांना करावा लागत आहे. आशिष सिनेमागृह ते अगदी वाशी नाका म्हाडा कॉलनी परिसरापर्यंत कशाही पद्धतीने रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केली जातात. आर. सी. एफ पोलीस ठाण्यासमोर असलेल्या रायन इंटरनॅशन शाळेसमोरील रस्त्यावरही दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेत अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात. आरसीएफ पोलीसही केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावना उमटत आहे.

मोनो रेल्वेच्या पुलाखाली थाटात पार्किंग
साईबाबा हॉस्पीटल, अंकुर नर्सिंग होम, सीता इस्टेट असा इंडस्ट्रियल आणि हॉस्पीटल परिसर असलेल्या भागातही अनधिकृत पार्किंगवाल्यांची चलती आहे. मोनो रेल्वे पुलाखाली अवजड वाहने तसेच रिक्षा आणि खासगी कारचालक आपल्याच मालकीचे पार्किंग आहे अशा थाटात वाहने पार्किंग करतात. या अनधिकृत वाहन पार्किंगकडे वाहतूक पोलिसांनी कानाडोळा केल्याने याला आवर घालणार कोण, असा सवाल नागरिक विचारीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *