मुंबई, दि.९ : अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज मंत्रालयात घेतला. विभागातील प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लावावीत तसेच अन्न व औषध प्रशासन विभागातील पदभरती टप्याटप्याने करण्यात यावी. असे निर्देश मंत्री आत्राम यांनी यावेळी दिले. वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, सहआयुक्त (औषधे) भूषण पाटील, सहआयुक्त रावसाहेब समुद्रे, सहआयुक्त (औषधे) डी. आर. गहाणे, मुख्य प्रशासकीय अधिकारी, र.शी.राठोड, उपसचिव वैशाली सुळे, अवर सचिव हेमंत महाजन आदी उपस्थित होते.
मंत्री आत्राम म्हणाले की, मागील वर्षभरात भेसळयुक्त अन्नपदार्थाची दखल घेऊन तेथे छापे टाकून कारवाई करण्यात येत आहे. यामुळे भेसळ करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. तालुकास्तरावर प्रशासनाच्या अन्न विभागासाठी अधिकारी व कर्मचारी यांची पदे वाढवण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. लिपीक टंकलेखक व नमुना सहाय्यक ही व्यपगत घोषित करण्यात आलेली पदे पुनर्जीवित करण्याबाबत कार्यवाही करावी. अन्न व औषध प्रशासन बाह्य संपर्क व संवाद योजनेस मान्यता व निधी मिळण्याबाबत प्रस्तावावर मान्यता घेणे, अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळा चालवण्यासाठी पीपीपी मॉडेल राबविण्याबाबत कार्यवाही तातडीने करावी. प्रशासनाच्या हेल्पलाईनसाठी महाआयटी खासगी यंत्रणेकडून तांत्रिक सोयी- सुविधा-सह नियंत्रण कक्षात मनुष्यबळ उपलब्ध करावे. प्रशासनाच्या गुप्त सेवा निधीमध्ये वाढ करणे. बाह्ययंत्रणेद्वारे पदभरती, अन्न सुरक्षा कार्यप्रणाली बळकटीकरण करणे. गडचिरोली तसेच इतर जिल्ह्याच्या कार्यालयाकरिता इमारत बांधकामाची सद्य:स्थिती, अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण शिबिरं अशा विविध विषयांचा आढावा मंत्री आत्राम यांनी यावेळी घेतला.