21 नोव्हेंबरनंतर राष्ट्रवादीचे सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन

भाजपचे सरकार अपयशी ठरले  – सुनील तटकरेंची टीका

महाड : राज्य सरकारविरोधात काँग्रेसने जनआक्रोश आंदोलन छेडले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसही सरकारविरोधात मैदानात उतरणार आहे. २१ नोव्हेंबरनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व आमदार सुनील तटकरे यांनी महाड येथे दिली. राज्य सरकारने कृषी सन्मान योजनेतून शेतक-यांची फसवणूकच केली आहे. नोटबंदी आणि जीएसटीनंतर उद्योगधंदे बंद पडलेत. सगळयाच बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीकाही तटकरे यांनी केली.
तटकरे म्हणाले की, नोटबंदी आणि जी.एस.टी.लागू झाल्यापासून अनेक उद्योग बंद पडले आहेत. बेरोजगारी वाढीस लागली असून परकीय आणि खाजगी गुंतवणूक पूर्णपणे ठप्प आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. महिलांवर अत्याचाराच्या घटनेत वाढ झालीय. सरकारने ऑनलाईन अर्ज पद्धतीने शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून त्यांची घोर फसवणूक करीत त्यांच्यावर अविश्वास दाखवला आहे. शिवसेनेचा बिनपैशाचा तमाशा सुरू आहे. नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून विरोध केला जात आहे मात्र राजीनामा देण्याचे धाडस सेनेत उरलेले नाही. राणेंबरोबर सेनेच्या मंत्र्यांना बसावे लागेल तेंव्हा मात्र सेना पक्ष प्रमुखांच्या निर्णयाची कसोटी आहे असेही त्यांनी सांगितले.
महाड पोलाद्पूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे ठप्प आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामात देखील गैरव्यवहार झाले आहेत. याबाबत आपण चौकशीची मागणी करणार आहोत. महाड तालुक्यातील काळ जलविद्युत प्रकल्प शासनाने विनाकारण रखडवून ठेवला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि विजेचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाने पावले उचलली पाहिजेत असेही ते म्हणाले. संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकत्यांनी गावागावात जावे व जनतेचे प्रश्न सोडवावेत असा सल्लाही तटकरे यांनी कार्यकत्यांना दिलाय.

अनंत गीते अवघड खात्याचे मंत्री
ज्या रायगडमधून अनंत गीतेंना खासदार म्हणून निवडून दिले त्यांना रायगडच्या प्रश्नाची जाणीव राहिलेली नाही. त्यांना रायगडमध्ये फिरण्यास वेळ देखील नाही. रायगडमध्ये ते एकही उद्योग आणू शकले नाहीत त्यामुळे ते अवजड खात्याचे मंत्री आहेत कि अवघड खात्याचे अशा शब्दात तटकरे यांनी गीते यांच्यावर टोमणा लगावला. मुंबई गोवा महामार्गावर टोल बसवावा असे गीते यांनी म्हणणे लाजिरवाणे आहे असेही तटकरे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!