मुंबई : पीएनबी मेटलाइफ बॅडमिंटन स्पर्धेच्या सातव्या पर्वामध्ये श्रीयांश नायडू, प्रिया आंबुर्ले, श्लोक गोयल, विश्वजीत थविल हे आपापल्या गटात विजेते ठरले. अंधेरी क्रीडा संकुल स्टेडियममध्ये ९ गटांमध्ये झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या १२०० हून अधिक खेळाडूंनी कौशल्य सादर केले.
९ वर्षांखालील मुलांच्या विभागात श्रीयांश नायडूने १५-१३, १०-१५, १५-१२ अशा फरकाने जीत मुथैयनचा पराभव केला. ९ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रिया आंबुर्लेने १६-१४, १३-१५ व १५-७ या गुणफरकाने कैरवी कुलकर्णीला पराभूत केले. ११ वर्षांखालील मुलांच्या गटात श्लोक गोयलने जतीन सराफवर १५-८, १५-९ असा विजय मिळवला. ११ वर्षांखालील मुलींच्या गटात समिक्षा मिश्राने हेझल जोशीचा ११-१५, १५-१३, १५-१२ असा पराभव केला. १३ वर्षांखालील मुले एकेरी स्पर्धेत विश्वजीत थविलने मयुरेश भुत्कीवर चुरशीच्या सामन्यात १५-८, १५-१३ अशी मात केली. १३ वर्षांखालील मुलींच्या गटात नाइशा वर्माने प्रांजल देढियाचा सरळ सेटमध्ये पराभव केला.
१५ वर्षांखालील मुलांच्या गटात देवांश सकपाळने यश ढेंबरेला हरवले. मुलींच्या गटात मनिस्टा मोहपात्राने प्रांजल शिंदेचा सहज पराभव केला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात मल्हार घाडीने ढेंबरेविरुद्ध विजय संपादन केला. मुलींच्या गटात मनिस्टा मोहपात्राने मृणाल पोतदारवर विजय मिळवला.
पंजाब नॅशनल बँकेचे महांचालक मोहम्मद मक्सूद अली, पीएनबी मेटलाइफचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी शिशीर अगरवाल, पीएनबी मेटलाइफचे चीफ फायनान्स ऑफिसर निलेश कोठारी, पीएनबी मेटलाइफचे एजन्सी चॅनलचे व्हॅल्यूड पार्टनर सनातनम श्रीनिवासराघवन आणि बॅडमिंटन असोसिएशनचे बॅडमिंटन असोसिएशनचे प्रेसिडंट अविनाश धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ झाला.