नवी मुंबईत दुस-यांदा ‘ भुयारी दरोडा ‘ : बँकेतील २७ लॉकर लुटले
नवी मुंबई : नवी मुंबईतील जुईनगर सेक्टर ११ मधील बँक ऑफ बडोदाची शाखा दरोडेखोरांनी लुटून नेली. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी बँकेच्या शेजारील दुकानाजवळ खड्डा खोदून भुयार तयार करून बँकेत प्रवेश करून ग्राहकांच्या 237 लॉकरपैकी 27 लॉकर्सवर चोरट्यांनी हात साफ केला. काही वर्षापूर्वी वाशी सेक्टर नऊमध्ये अशाच पध्दतीने बाजूचे दुकान भाड्याने घेऊन सोनाराच्या दुकानापर्यंत भुयार खोदून सोन्याचा ऐवज लांबविण्याची घटना घडली होती. सोमवारी सकाळी एक ग्राहर लॉकररूमध्ये आला असतानाच हा प्रकार उजेडात आला. दरोडेखोरांच्या नामी शक्कलीने पोलीसही चक्रावून गेले आहेत. चार महिन्यांपूर्वीच घेसाराम नावाच्या इसमाने दुकानाचा गाळा भाडयाने घेतला होता. त्यामुळे पोलीसांकडून दुकानाचा मालक आणि एजंट यांची चौकशी करण्यात येणार आहे. हे भुयार एका रात्रीत खोदले गेले नाही. त्यासाठी अनेक दिवस लागले असतील. संपूर्ण प्लॅनिंग करूनच एखाद्या टोळीने हे भुयार खोदले असावे, असं पोलिस सूत्रांनी सांगितलं. एवढे मोठे भुयार खोदले जात असताना आजूबाजूच्या लोकांना त्याचा सुगावा कसा लागला नाही? याविषयी पोलीस आश्यर्च व्यक्त करतात.
ग्राहकांचा बँकेभोवती गराडा
बँक ऑफ बडोदामधील हा प्रकार उजेडात आल्यानंतर बँकेचे कामकाज पोलिस तपासासाठी बंद ठेवण्यात आले होते. ग्राहकांनी बँकेभोवती गराडा घातला होता. आपल्या लॉकरमधील काही चोरीला गेले आहे का याची चौकशी करताना दिसत होते. मात्र एकूण किती दरोडा पडला याची माहिती मिळू शकली नाही. अजून पोलिसांचे तपास कार्य सुरू आहे.