आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा : विरोधी पक्षनेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
मुंबई : नांदेड शासकीय रुग्णालयातील ३१ रुग्णांच्या मृ्त्यूने राज्यभरात खळबळ उडाली असतानाच आता छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी ठाण्यात १८ रुग्णाचा मृत्यू झाला होता. या संपूर्ण प्रकरणावरुन राज्य सरकारवर सडकून टीका होत असून राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
वडेट्टीवार ट्विट मध्ये म्हणतात की,“मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे” ही म्हण आपण ऐकली आहे. पण लोणी खाण्यासाठी मृत्यू घडवून आणणारे राज्यकर्ते आज महाराष्ट्रात सत्ता चालवताय हे महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्दैवी अशी गोष्ट आहे. आधी ठाणे, आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात मृत्यूचा थैमान… किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहेत ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आरोग्यमंत्री कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देत आहेत, आरोग्य खात्याचे हजारो कोटींची टेंडर काढण्यात येत आहेत. इकडे औषधांच्या तुटवड्यामुळे निष्पाप लोकांचा जीव जातोय. त्यामुळे टेंडर काढलेली कामे होत नाही आहे हे स्पष्ट आहे. मग टेंडरचा पैसा कुणाच्या खिशात चाललाय ? असा रोखठोक सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघांचा राजीनामा घ्यावा. जर सरकारने दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे महायुती सरकार नसून मलिदा खाण्यासाठी शासकीय रुग्णालयांना स्मशानघाटात रूपांतरित करणारे “हत्यारे सरकार” आहे हीच ओळख या सरकारची जनतेत निर्माण होईल असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
राज ठाकरेंचा संताप…
दरम्यान, शासकीय रुग्णालयातील या धक्कादायक प्रकारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला आहे. “तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.