सोलापूर : ऊस बंदीच्या निर्णयाविरोधात रयत क्रांती संघटना आक्रमक झाली असून, आज संघटनेच्या वतीने सरकोली येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करीत निषेध आंदोलन केले.
राज्य सरकारने या वर्षीच्या हंगामात ऊसावर झोणबंदी लावली आहे. 1996 साली राज्य सरकारने झोणबंदी लावली होती. स्वर्गीय शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली आणि त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी झोणबंदी उठवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राजकारण करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी झोणबंदी लावून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे असा आरोप संघटनेने केला.
एका बाजूला ऊसाचे उत्पादन घटले आहे. ऊत्पादन खर्च वाढला असताना ऊसाची कांडी ही सोन्याची कांडी आहे ,मजुरी वाढली, खताच्या किमती चौपट झाल्या आहेत. नागंरटीचा खर्च वाढला आहे त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघत नाही. आता सरकारने ऊसाचा एफआरपी प्रती टन पाच हजार भाव जाहीर करावा अन्यथा झोणबंदी उठवावी, जर झोणबंदी उठवली नाहीत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील वाजत गाजत बाहेरच्या राज्यात ऊस घेऊन जावू असा इशारा रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सरकारला दिला आहे.