जयंत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबई : मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  राज्यसरकार टीकेची झोड उठवली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील कांदा उत्पादकशेतकऱ्याला ११२ क्विंटल कांद्याचे अवघे २५२ रुपयाचे अनुदान दिले आहे आणि दुसरीकडे मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीसाठी कोटी रुपये खर्च केले जात आहे. मंत्र्यांचा शाही थाट आणि शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मंत्र्यांच्या थाटावर कडक शब्दात टीका केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी होत आहे. बैठकीसाठी गेल्या काही दिवसांपासून यंत्रणेची लगबग सुरु असून बैठकीसाठी वाहन, हॉटेल्स, विश्रामगृह आरक्षित करण्यात आले आहे. दरम्यान, या बैठकीच्या तयारीसाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकासत्रही सुरु असून मंत्रिमंडळासाठी सुमारे ४०० अधिकारी दिमतीला असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीसाठी आजपासूनच (शुक्रवारी) काही मंत्री शहरात दाखल होत आहे. तर काही मंत्री शनिवारी सकाळी दाखल होतील. मंत्रिगणासाठी शासकीय विश्रामगृहासह, हॉटेल रामा आणि ताज या पंचतारांकित हॉटेल्समधील खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. या निमित्ताने विश्रामगृहांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या सगळ्यावरूनच जयंत पाटील यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

सहा महिन्यांपूर्वी अत्यल्प भावात कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून प्रती क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चिंचवाड येथील शेतकऱ्याने ११२ क्विंटल ९० किलो लाल कांदा विकला त्यानुसार ३९ हजार अनुदान मिळणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर फक्त २५२ रुपये टाकण्यात आले.

एकीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, दीड हजार रुपयांची जेवणाची एक थाळी असा शाही थाट… आणि दुसरीकडे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्याला अवघे २५२ रुपये अनुदान जमा करत सरकारने क्रूर थट्टा केली आहे. लोकांच्या पैशांवर मजा करणाऱ्यांना जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा, असं सरतेशेवटी म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!