जालना : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणाची अखेर सांगता झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी जावून जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस स्वीकारुन उपोषण सोडलं. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्याचबरोबर रोहयोमंत्री सांदिपान भुमरे आणि अर्जुन खोतकर आणि माजी मंत्री राजेश टोपे उपस्थित होते

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मला अनेक फोन आणि मेसेज आले होते. पण मुख्यमंत्री असलो तरी प्रोटोकॉल बाजुला सारुन मनोज जरांगे पाटील यांना भेटायचचं, हे मी ठरवले होते. मराठा समाजाला आपला अधिकार मिळालचा पाहिजे. राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, ते मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही दिली.   

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात चालू असणाऱ्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. “जे जे फायदे ओबीसींना मिळत आहेत. ते फायदे आपल्या समाजाला देण्याचं काम आपण करत आहोत. आपलं रद्द झालेलं आरक्षण मिळालं पाहिजी ही भूमिका सरकारची आहे. त्यासाठी जे काही चालू आहे, त्यावर मी स्पष्टपणे बोलू इच्छित नाही. जस्टिस शिंदे कमिटी त्यावर काम करत आहे. मराठवाड्यातील ज्यांच्याकडे जुनी प्रमाणपत्रं असतील, नोंदी असतील, काहींकडे नसतील…त्यासाठीच आपण जस्टिस शिंदे कमिटी स्थापन केली. जेणेकरून न्यायालयात काय टिकेल, काय नाही टिकणार याची माहिती त्यांच्याकडे असते. त्यांचं काम सुरू झालं आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

दरम्यान, यावेळी राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या समितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा एक सदस्य द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. “मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या कसा मागास आहे या सगळ्या गोष्टी ते तपासत आहेत. मी त्यांना सांगितलं की तुमचा एक माणूस त्या कमिटीत दिला तर अधिक फायदा होईल”, असं शिंदे म्हणाले.

यावेळी मनोज जरांगे म्हणाले, “मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात हे मी पहिल्यापासून सांगत आहे. हीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा माणसाला तुमच्याबद्दल आशा आहे. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे मी तुम्हाला शब्द दिलाय त्याप्रमाणे आरक्षण देऊनच मी थांबणार आहे. सरकारने 1 महिन्याची मुदत मागितली आहे. मी समाजाला विचारून ही मुदत देण्याबद्दलचा निर्णय घेतला. समाजाच्या निर्णयानुसार मी हा निर्णय घेतला. यापुढेही तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी एका महिन्याच्या मुदतीनंतर आणखी 10 दिवस मुदत वाढवून देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *