महाडमधील आरोग्य उपकेंद्राचे तीनतेरा..करोडो रुपये खर्चून बांधलेल्या इमारती धूळ खात
महाड (निलेश पवार) : महाड तालुक्यात बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतीवर करोडो रुपये खर्च करून त्या बांधण्यात आला आहेत. मात्र एकही अधिकारी फिरकत नसल्याने आरोग्य उपकेंद्रे धूळ खात पडली आहेत. त्यामुळे महाडमध्ये आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहे.
महाड तालुक्यात सहा प्राथमिक केंद्र आहेत. मात्र तालुक्याचा विस्तार पाहता याठिकाणी आरोग्य सुविधा पोहोचवणे कठीण असल्याने आरोग्य उपकेंद्राची सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. महाड तालुक्यात जवळपास 27 आरोग्य उपकेंद्र आहेत. यासाठी भल्या मोठ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. यातील कांही रायगड जिल्हा परिषदेने तर कांही केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत बांधण्यात आल्या आहेत. एका आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीला जवळपास २५ ते ३० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात या इमारती बांधल्या आहेत मात्र पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने आणि याठिकाणी नेमलेल्या आरोग्य सेवकाची राहण्याची मानसिकता नसल्याने हे आरोग्य उपकेंद्र धूळ खात पडून असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे ग्रामीण आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजत असून केवळ ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींचे खिसे भरण्यासाठी या इमारती बांधण्यात आल्या का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. रायगड जिल्ह्यात हीच अवस्था असून जर कर्मचारी आणि कोणतीच सुविधा देण्याची मानसिकता जिल्हा परिषदेकडे नसेल तर लाखो रुपये खर्चून या इमारती कोणासाठी बांधल्या हा प्रश्नच नागरिकाकडून केला जात आहे. याबाबत येत्या सभेत आपण आवाज उठवणार असून तत्काळ कर्मचारी भरती आणि आरोग्य उपकेंद्र सुरु केले जावेत आशी मागणी केली जाईल असे जिल्हा परिषद सदस्य – मनोज काळीजकर यांनी सांगितले.
महाड तालुक्यात २७ आरोग्य उपकेंद्र
महाड तालुक्यात २७ आरोग्य उपकेंद्र आहेत. यापैकी ८ आरोग्य उपकेंद्र हि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत तर जवळपास १५ केंद्रांच्या इमारती या रायगड जिल्हा परिषदेने बांधल्या आहेत. महाडमध्ये बिरवाडी, विन्हेरे, पाचाड, चिंभावे, दासगाव, वरंध, या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. बिरवाडी मधील मांघरून, वाळण बु, शेलटोळी, मुख्यालय, चिंभावे विभागातील चोचींदे, दासगाव भागातील टोळ बु, वरंध मध्ये कुंभे शिवथर, वरंध, याठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान NRHM अंतर्गत तर वाळण खु, निगडे, ताम्हाणे, आंबवडे, नागाव, करंजाडी, मुमुर्शी, कोंझर, नाते, आचलोळी, अप्पर तुडील, देशमुख कांबळे, इसाने कांबळे, राजेवाडी, भावे याठिकाणी रायगड जिल्हा परिषदेने करोडो रुपये खर्च करून ईमारती बांधल्या आहेत. यापैकी छत्री निजामपूर याठिकाणी रायगड जिल्हा परिषदेने जवळपास दहा वर्षापूर्वी आरोग्य उपकेंद्र बांधले होते मात्र तेव्हापासून हे आरोग्य उपकेंद्र कधीच सुरु राहिलेले नाही. यामुळे निजामपूर येथील इमारत पूर्णत नादुरुस्त झाली आहे.
या गावात आरोग्य केंद्रासाठी जागा नाही
दहीवड, कुंबळे, तेलंगे, दासगाव याठिकाणी जागेअभावी आरोग्य उपकेंद्राच्या इमारती बांधण्यात आलेल्या नाहीत. टोळ गावात बांधण्यात आलेले आरोग्य उपकेंद्र अद्याप सुरूच झालेले नाही. एकीकडे भव्य इमारती बांधण्यात आल्या मात्र दुसरीकडे याठिकाणी सोई सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. आरोग्य उपकेंद्रावर पुरेसा कर्मचारी वर्गच उपलब्ध नाही. प्रत्येक आरोग्य उपकेंद्रावर एक आरोग्य सेवक आणि एक आरोग्य सेविकेची नेमणूक आहे मात्र महाड तालुक्यात आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचारी तुटवडा आहे. महाड तालुक्यात वैद्यकीय अधिकारी १२ पदे मंजूर आहेत यापैकी ८ पदे भरलेली आहेत ४ वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. आरोग्य पर्यवेक्षक दोन्ही पदे रिक्त, आरोग्य सहाय्यक १३ पैकी ४ पदे रिक्त, आरोग्य सहायिका १ रिक्त, औषध निर्माता ४ रिक्त, आरोग्य सेविका मुख्यालय ३ रिक्त, आरोग्य उपकेंद्रावर नेमण्यात आलेल्या आरोग्य सेविका ५ रिक्त, आरोग्य सेवक ५ रिक्त, वाहन चालक ५ रिक्त, शिपाई ४ रिक्त, सफाई कामगार ६ रिक्त आहेत. महाड तालुक्याला तालुका आरोग्य अधिकारी देखील उपलब्ध नाही. तालुक्यातील आरोग्य अधिकारीच तालुका आरोग्य अधिकारी पद सांभाळत आहे.
कंत्राटी कर्मचारी कायमच्या प्रतीक्षेत
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने अनेक कर्मचारी गेली १० वर्षापासून काम करत आहेत. त्यांना प्रशासकीय अनुभव देखील आहे. असे असताना या कर्मचार्यांना प्राधान्य न देता जिल्हा परिषदने नव्याने भरती करण्याच्या मागे घाट घातला आहे. पण नव्या भरतीत आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा सुरू आहे.