मुंबई, दि. ५ः 
मराठा आंदोलकांपुढे सरकारने गुडघे टेकले आहेत. उपोषणकर्ते मनोज जरांगे – पाटील यांच्यावर दबाव टाकला जातो आहे. विविध आमिष दाखवली जात आहेत. परंतु, हा माणूस त्यांच्यापुढे झुकत नाही. महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. त्यामुळे मंत्री- संत्री जाऊन त्यांची मनधरणी केली तरी, पन्नास खोक्याच्या सरकारपुढे हे आंदोलक कधीही झुकणार नाहीत, असे शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सांगत सरकारवर घणाघात केला. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालन्यात शांततेत सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केल्याने, वातावरण तापले. राज्यात त्याचे सर्वदूर पडसाद उमटत आहेत. संजय राऊतांनी यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले. मराठा आंदोलकांचे आंदोलन चिघळल्यानंतर सरकारने त्यांच्या समोर गुडघे टेकले आहेत. मनोज जरांडे पाटील यांनी आठ दिवसांपासून पुकारलेले उपोषण मागे घ्यावे, यासाठी मोठा दबाव टाकला जातो आहे. विविध आमिष दाखविण्यात येत आहे. परंतु, ते झुकत नाहीत, याचा अभिमान आहे. आता सरकारचे शिष्ठमंडळ जालन्यात जाऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी देखील सरकारचे प्रतिनिधी गेले होते. काय झाल, आंदोलन संपले का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. न्याय हक्कासाठी लढणार आंदोलक गरिब असले तरी पन्नास खोक्यात ते कधी विकले जाणार नाहीत, असे राऊत म्हणाले.

कोट्यवधीचे कर्ज बुडवून फरार झालेला ललित मोदी आणि मोईन खान यांच्या ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणा शोधात आहेत. मात्र, फसवणूक करून देशाबाहेर गेलेला व्यक्ती हरीश साळवेंच्या पार्टीत दिसतात. साळवे हे वन नेशन वन इलेक्शनच्या समितीचे सदस्य आहेत. तेव्हा अशा व्यक्तींना या समितीत ठेवले जाणार का, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खुलासा करावा. कारण केंद्राच्या वन नेशन वन इलेक्शनच्या समितीत माजी विरोधी पक्षनेते गुलाबनबी आझाद यांना घेण्यात आले. परंतु, आताचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांना स्थान दिले नाही. तेव्हा या सरकारचा उद्देश स्पष्ट होतो, असे सांगत राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. भ्रष्टाचारांची कॉलर पकडण्याची भाषा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे भगोडे दिसत नाहीत का, असे राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!