जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या आंदोलकांवर झालेल्या कारवाईवरून राजकीय वाद पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपोषकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांना धीर देत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. ज्या लोकांनी तुमच्यावर गोळीबार करण्याचे आदेश दिले, त्यांच्यावर मराठवाड्यात बंदी घालण्याचं आवाहन राज ठाकरेंनी आंदोलकांना केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे मी मराठा क्रांती मोर्चे निघत होते, त्याचवेळी सांगितलं होतं. हे सर्व राजकारणी तुमचा वापर करून घेतील. मराठा आरक्षण हा सुप्रीम कोर्टातला तिढा आहे, अशा काही कायदेशीर बाजू आपल्याला समजून घ्याव्या लागतील. परंतु आंदोलन सुरू असताना तुमच्यावर लाठीचार्ज आणि गोळीबाराचे आदेश कुणी द्यायला लावले?, ज्यांनी असे आदेश दिलेत, त्यांच्यावर मराठवाड्यात बंदी घालायला हवी, असं म्हणत राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आरक्षणाचं आमिष दाखवून सत्ताधारी बदलतात, सत्तेत आल्यानंतर हे लोक तुमच्यावर गोळ्या झाडणार, पोलिसांना दोष देऊ नका, पोलिसांना आदेश कुणी दिलेत, त्यांना दोष द्या. जे आदेश आले त्याचं पालन पोलिसांनी केलं. आरक्षणावर राजकारण करत मतं पदरात पाडून घेतली की तुम्हाला वाऱ्यावर सोडून द्यायचं, असाच खेळ सध्या सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते तर त्यांनी आज काय केलं असतं?, मी काय आज इथं राजकारण करायला आलेलो नाही, तर मराठा आंदोलकांना विनंती करायला आलोय, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
पोलिसांनी माता-भगिनींवर लाठ्या बरसल्या, त्याचे फूटेज मी पाहिलेत. याबाबत मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यात काय तोडगा निघेल, याबद्दल मला सध्या तरी काही सांगणं शक्य होणार नाही. मला खोटं बोलणं जमणार नाही. संबंधित लोकांशी बोलून विषय सुटण्यासारखा असेल मी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहनही राज ठाकरेंनी आंदोलकांना केलं आहे.