मुंबई : जालना येथे पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. यावरून शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस आणि पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्हाला ‘इंडिया’ आघाडीच्या विरोधात बोलण्यास वेळ आहे. पण, एकाही मंत्र्याला आंदोलकांना भेटण्यास वेळ मिळाला नाही. दोन फुल एक हाफमधील एकही नेता भेटण्यास गेला नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
मुंबईतील रंगशारदा येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले, आज संध्याकाळी जालन्याला जातोय. काल शासकीय अत्याचार झाला. नुसता निषेध व्यक्त करुन होणार नाही. सरकार कोण तर एक फुल दोन हाफ. लोक उपोषणाला बसले होते. आपली इंडियाची बैठक सुरु होती त्यावर पत्रकार परिषद घ्यायला वेळ आहे पण आंदोलनकर्ते बसले तिकडे कुणालाच मंत्र्यांना वेळ नाही. एक फुल दोन हाफला माहिती नव्हती उपोषण सुरु आहे. बारसुला, वारकरी, काल मराठा समाजाच्या आंदोलनात अत्याचार झाला. तुमच्या आदेशाशिवाय पोलीस असे वागूच शकत नाही. सरकार आपल्या दारी थापा मारतय लय भारी हा कार्यक्रम त्यांना तिकडे घ्यायचा होता अशी टीका त्यांनी केली.
विशेष अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा
दिल्लीतील अधिकार दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती जावू नये म्हणून केंद्र सरकारने विधेयक आणलं. सर्व अधिकार आपल्या हाती घेतले. मग विशेष अधिवेशनात वटहकूम काढून आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा. मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. विशेष अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा, असं सांगतानाच इंडिया आघाडीवर टीका करायला वेळ पण आंदोलनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
गणपतीत अधिवेशन कशाला?
या सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. गणपतीत विशेष अधिवेशन बोलावलं आहे. 2012मध्ये त्यांनी गणपतीत भारतबंद पुकारला होता. आम्हाला बंदमध्ये सहभागी होण्यास सांगितलं होतं. पण बाळासाहेबांनी स्पष्टपणे नकार दिला. गणपतीत भारत बंद कसला करताय असा सवाल बाळासाहेबांनी केला होता. त्यामुळे आम्ही त्यावेळी भारत बंदमध्ये सहभागी झालो नव्हतो. आताही त्यांनी गणपतीत अधिवेशन बोलावलं आहे. आमच्या सण उत्सवाच्या वेळी हे अधिवेशन होत आहे, असं सांगतानाच डिसेंबरमध्ये भाजपने देशातील सर्व विमानं बुक केली आहेत. निवडणुका झाल्या तर काय करायचं? असा सवाल त्यांनी केला.