मुंबई : मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुका डोळयासमोर ठेवून इंडिया आघाडीने समन्वय समितीची स्थापना केली असून या समितीत १३ सदस्यांचा समावेश असणार आहे या समितीमध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आण शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे.

इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समन्वय समितीत महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा या समितीत समावेश आहे. याशिवाय काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल, डीएमकेचे एम के स्टेलिन, आरजेडीचे तेजस्वी यादव, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चढ्ढा, जावेद अली खान, ललन सिंह, डी राजा आणि ओमर अब्दुला, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांचा या समन्वय समितीत समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीकडून आज महत्त्वाची रणनीती आखण्यात आली. या रणनीतीचा एक भाग म्हणून हे तीन ठराव करण्यात आले आहेत.

‘ते’ तीन ठराव

आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुका शक्य तितक्या एकत्र लढण्याचा संकल्प करतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागा वाटपाची व्यवस्था ताबडतोब सुरू केली जाईल आणि लवकरात लवकर जागा वाटपाची ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल
आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष देशातील वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रितपणे सार्वजनिक रॅली आयोजित करण्याचा संकल्प करतो.
आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष विविध भाषांमध्ये ‘जितेगा भारत’ या थीमसह आमच्या सर्व धोरणे आणि मोहिमांमध्ये समन्वय साधण्याचा संकल्प करतो.

30 सप्टेंबरपर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला ?

इंडिया आघाडीच्या जागा वाटपात गिव्ह अॅण्ड टेक या आधारावर काही जागांची अदलाबदल होणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय याबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 30 सप्टेंबरपर्यंत इंडिया आघाडीकडून देशभरात लोकसभेच्या निवडणुकीसाठी जागा वाटप करण्यात येणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त एकीने राहून एनडीला झटका द्यायचा, अशी इंडिया आघाडीची रणनीती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!