पळसदरी राज्य मार्गावरील खड्डयांची प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी : ग्रामस्थांनी काम बंद पाडले
ठेकेदार- अधिका-यांकडून होतेय, करोडो रूपयांची लूट : माजी आमदारांचा आरोप
कर्जत (राहुल देशमुख ) : कर्जत तालुक्यातील पळसदरी मार्गे खोपोलीला जाणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवल्याने अवघ्या तीन वर्षात खराब झाल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आलाय. मात्र दरवर्षी खड्डे भरण्याची मलमपट्टी केली जात असल्याने पळसदरी ग्राम पंचायत हद्दीतील नांगुर्ले, तिघर, वर्णे ,पळसदरी, तलवली येथील अनेक ग्रामस्थांनी माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन या मार्गाचे खड्डे भरण्याचे तात्काळ बंद केले. पळसदरी -खोपोली राज्य मार्ग म्हणजे ठेकेदार आणि अधिका-यांचे करोडो रुपये कमावण्याचे साधन बनल्याचा आरोप माजी आमदार साटम यांनी केला याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केलीय.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधून पळसदरी मार्गे खोपोलीला जाणारा राज्य मार्ग सन २०१४-१५ मध्ये प्रवासासाठी खुला करण्यात आला.मात्र निकृष्ट दर्जाचे काम केल्याने दरवर्षी या राज्य मार्गावरील खड्डे भरण्याच काम करून करोडो रूपयांची लूट केली जात असल्याचा आरोप केला जातोय. यावेळी माजी आमदार साटम म्हणाले की, २०१४-२०१७ पर्यंत या मार्गाची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालीय. शुक्रवारी अधिकाऱ्यांना दुरध्वनीद्वारे संपर्क केल्यानंतर आज खड्डे टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम सुरू केलं. पण मार्गाचे उत्तम दर्जाचे काम अजूनपर्यंत का केले गेले नाही असा सवाल सर्व सामान्य नागरिकांमध्ये उपस्थितीत होत आहे. गेल्या तीन वर्षात या मार्गावरुन प्रवास करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. येत्या दोन दिवसात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि एमएमआरडीए अधिका- यांची भेट घेऊन रस्ता सुस्थितीत करण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी अनिल देशमुख , विजय थोरवे, नंदकुमार देशमुख, मनोहर देशमुख, हनुमंत देशमुख,संतोष देशमुख, अनिकेत देशमुख, हरिचंद्र पाटील, राजेंद्र मरले, दिनेश गावडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.