कल्याणात भरदुपारी कारागिरावर गोळीबार ; अडीच लाख आणि तीन तोळे सोने लूटले
रिव्हॉल्वरचे मॅगेझिन खाली पडल्याने कारागीर बचावला
कल्याण : सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिरावर एका दरोडेखोर त्रिकुटाने गोळी झाडत दरोडा टाकला. अडीच लाख रुपयांची रोकड व तीन तोळे सोने लुटून पळ काढण्यात दरोडेखोर यशस्वी झाले. ही घटना भरदुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेतील चिखलेबाग परिसरातील जिजाऊ कॉलनीतील कारखान्यात एकनाथ जाधव हा कारागीर सोन्याचे दागिने बनवत असताना दुचाकीवरून एक त्रिकुट तेथे आले. त्यांनी एकनाथला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत त्याच्याकडील अडीच लाख रुपयांची रोकड आणि तीन तोळे सोने हिसकावून घेतले. एकनाथने त्यांना विरोध केला असता दरोडेखोरांनी रिव्हॉल्वरने त्याच्या दिशेने गोळी झाडली, मात्र त्याचवेळी रिव्हॉल्वरचे मॅगेझिन खाली पडल्याने त्यांचा प्रयत्न फसला आणि एकनाथ बचावला. याप्रकरणी एकनाथ जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
——————————————————————————————————
हॉटेल व्यावसायिकाला २५ लाखांच्या खंडणीसाठी सुरेश पुजारीच्या नावाने धमकी
कल्याण : कल्याण शहरातील एका हॉटेल व्यवसायिकाच्या घरी चिठ्ठी पाठवून व फोन करून धमकावत त्याच्याकडे गँगस्टर सुरेश पुजारीच्या नावाने २५ लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी सदर हॉटेल व्यावसायिकाने खडकपाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरातील एका इमारतीत भास्कर शेट्टी हे हॉटेल व्यावसायिक राहतात. दोन दिवसांपूर्वी घरी सायंकाळच्या सुमारास अज्ञात इसमाने त्यांच्या घरी एक चिठ्ठी टाकून पळ काढला होता. या चिठ्ठीत धमकी देत शेट्टी यांच्याकडून २५ लाखांची खंडणी मागण्यात आली होती. तसेच चिठ्ठीच्या शेवटी सुरेश पुजारी गँगस्टर असे नाव असल्याने शेट्टी भयभीत झाले. त्यातच पुढील दोन दिवसांनी शेट्टी यांना सुरेश पुजारीच्या नावाने धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्याने आपण सुरेश पुजारी बोलत असल्याचे सांगत जीवे ठार मारण्याची धमकी देत २५ लाखांची मागणी केली. या घटनांमुळे घाबरलेल्या शेट्टी यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी चिठ्ठी टाकणाऱ्या अज्ञात इसमासह सुरेश पुजारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षात सुरेश पुजारीने अनेकांना खंडणीसाठी धमकावण्याचे सत्र चालविल्याने व्यापारीवर्ग चांगलाच धास्तावला आहे.