मुंबई, : सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहिर केला. विविध सांस्कृतिक पुरस्कारांच्या निवड समित्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, तेव्हा त्यांनी ही घोषणा केली. सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध जीवन गौरव पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने, तर राज्य सांस्कृतिक कार्य पुरस्कारांच्या रकमेत तिपटीने वाढ करण्यात आली आहे. बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चौरे, समिती सदस्य प्रशांत दामले, अशोक पत्की, पं. ब्रिजनारायण, भरत बलवल्ली, माधव खाडीलकर, अरविंद पिळगावकर, रघुवीर खेडकर, श्रीमती राजश्री शिर्के, आदींसह पुरस्कार निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, संगिता चार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, तसेच 12 वेगवेगळ्या कला प्रकारात देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीच्या बैठका झाल्या. बैठकीत पुरस्कारांसाठी प्राप्त शिफारशी मधून संभाव्य नावांवर चर्चा करण्यात आली.

जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देत सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांची रक्कम पाच लक्ष रुपयावरून दहा लक्ष रुपये तर राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम दोन लक्ष रुपयांवरून तीन लक्ष रुपये करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 25 ते 50 वर्ष वयोगटातील कलावंतांना युवा पुरस्कार सुरू करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले. निवड समिती सदस्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने सत्यशील देशपांडे, उल्हास काशलकर, प्रभा अत्रे, डॉ अजय पोहनकर, अश्विनी भिडे – देशपांडे, पं. उस्मान खान, श्रीमती प्रज्ञा देशपांडे, मंजुषा पाटील सुमित राघवन, डॉ. मृदुला दाढे – जोशी, बाळू धुटे , सत्यपाल महाराज, विजयराज बोधनकर, जयराज साळगावकर आदी उपस्थित होते. बैठकीला अशासकीय सदस्य, शासकीय सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *