लाडवली प्राथमिक मराठी शाळेला मिळाले संगणक
महाड – प्राथमिक मराठी शाळा लाडवलीला महाड औद्योगिक परिसरातील श्रीहरी एक्स्पोर्ट प्रा.ली. या कारखान्याने संगणक भेट दिला आहे. यामुळे लाडवली मधील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला आहे. हा संगणक या गावातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून मिळाला आहे.
महाड शहराजवळ असलेल्या लाडवली प्राथमिक मराठी शाळा आय.एस.ओ. प्रमाणित आदर्श शाळा आहे. या शाळेत असलेली संगणकाची कमतरता लक्षात घेऊन येथील पत्रकार महेश शिंदे यांनी विशेष मेहनत घेऊन एम.आय.डी.सी.मधील श्री हरी केमिकल एक्स्पोर्ट ली. या कारखान्यामार्फत संगणक उपलब्ध करून दिला. हा संगणक भेट कार्यक्रम शुक्रवारी शाळेत पार पडला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच कृष्णा शिंदे, श्रीहरी केमिकलचे श्री.वारंगे, अवनीश तिवारी, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे, पत्रकार महेश शिंदे, शाळा शिक्षण समिती शेखर बेटकर, निवृत्त मुख्याध्यापक सुनील कदम, प्राईड इंडिया संस्थेचे नितीन पवार, शिरीष शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सरपंच कृष्णा शिंदे यांनी ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत शासन विविध सोईसुविधा देत असून शिक्षणाच्या बाबतीत देखील हि मुले कुठेच कमी नाहीत तरी देखील बदलत्या काळात लोकांची मानसिकता बदलत गेली आहे हि मानसिकता बदलली गेली तर या शाळा देखील पटसंख्येने फुलतील असे मत व्यक्त केले. तर महेश शिंदे यांनी देखील शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असून स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांनी उतरले पाहिजे असे सांगितले. कंपनीने हि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या एक प्रयत्न केलेला असून लाडवली शाळेतील मुलांची शिक्षण घेण्याची धडपड कौतुकास्पद असल्याचे वारंगे यांनी सांगून या संगणकाचा वापर ज्ञानवाढीसाठी करा त्याचे व्यसन बनवू नका असा सल्ला देखील दिला. यावेळी शाळेच्या मुख्याद्यापिका पूजा चिखले, निवृत्त शिक्षक सुनील कदम, शेखर बेटकर, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षिका कांचन राणे, स्नेहा गांधी, संगीता पाथरे, आदींनी विशेष मेहनत घेतली.