पुणे : अलिकडे आपल्यातील काही लोक विकासासाठी भाजपसोबत गेल्याचं सांगत आहेत. मात्र त्यात काही अर्थ नाही. सत्तेचा गैरवापर केला जातोय. ईडीच्या भातीने काही जण भाजपसोबत जाऊन बसलेत. पण राजकारणात सत्येची कास सोडून, कुणी दमदाटी करत असेल म्हणून तुम्ही त्या रस्त्याने जायचा निर्णय घेतला असेल तर माझी खात्री आहे, आज ना उद्या अशा भेकड प्रवृत्तीच्या लोकांना जनता वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शरद पवार यांनी अजित पवार गटावर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी साथ सोडून भाजपसोबत सत्तेत गेलेल्या सहकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांनी यावेळी कुणाचंही नाव न घेता टीका केली. ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने पुणे येथे आयोजित सोशल मीडिया मीट अप कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले, अनिल देशमुख १४ महिने तुरुंगात होते. त्यांनाही बदल करा इकडे या असं सांगण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी वैचारिक भूमिका सोडणार नाही, अशी भूमिका घेतली होती. अनिल देशमुख यांनी भूमिकेत बदल केला नाही, असं शरद पवार म्हणाले.
पवार म्हणाले, तुम्ही वर्तमानपत्रे बारकाईने पाहिले पाहिजे, टेलिव्हिजन बघितले पाहिजे आणि काय चालले याचा विचार केला पाहिजे. महागाई, गुन्हेगारी काही संपत नाही. शेतकऱ्यांना बाजारपेठेत काही योग्य भाव मिळत नाही. या प्रश्नांची प्रत्येक माणसाला चिंता आहे,असेही शरद पवार यांनी जनतेला सांगितले. महाराष्ट्रातील किती प्रकल्प इथून गूजरातला गेले. मी काही गुजरात भारताबाहेर असे म्हणत नाही. पण जो कारखाना राज्यात येणार होता, तो कारखाना येथून अन्य राज्यात हलवला गेला.यात चांगले काम करण्याची संधी राज्य सरकारने गमावली, अशी टीका देखील शरद पवार यांनी केली.