मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रय दिनाच्या भाषणात लाल किल्ल्यावरून मी पून्हा सत्तेत येईन असं वक्तव्य केलं होतं. मोदींच्या या वक्तव्याची तुलना शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली. पवार म्हणाले, स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी पंतप्रधानांनी तर देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेतले असे वाटत होते. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस असंच म्हणाले होते. मी पून्हा येईन… फडणवीस आले. पण ते दुस-या स्थानावर आले असा टोला पवार यांनी लगावला. २०२४ ची स्थिती मोदी भाजपला अनुकूल नाही. इंडिया आघाडीकडून पुढील रणनिती ठरवणार असल्याचे शरद पवार यांनी बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.

पवार म्हणाले की अजूनही माझ्‍या राजकीय निवृत्तीची वेळ आलेली नाही. २०२४ मध्‍ये देशातील चित्र बदलण्‍यासाठी आम्‍ही कष्‍ट करणार आहोत. भाजपाची भूमिका समाजविरोधी आणि फुट पाडणारी आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून भाजपा आणि मोदीं सरकार विरोधात बिहार आणि कर्नाटक या दोन राज्यात देशपातळीवर दोन सभा घेण्यात येतील. याबाबत १ सप्टेंबरच्या सभेत पुढील रणनीती ठरवण्यात येईल. सत्तेचा गैरवापर आज होत आहे. केरळमध्ये भाजपा नाही, तामिळनाडूत नाही, कर्नाटकात नाही. आंध्र प्रदेशात भाजपा नाही. तेलंगणात नाही. महाराष्ट्रात भाजपा सरकार कसे आले हे सगळ्यांना माहिती आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पाडून आले. राजस्थानात, दिल्ली, पंजाब, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये भाजपा नाही. मी पुन्हा येईन असं कितीही म्हटलं तरी देशात वेगळे चित्र दिसेल यात शंका नाही असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

पवार म्हणाले, भाजपाला लोकांमध्ये तेढ निर्माण करायचा आहे. धर्म आणि समुदायाच्या आधारावर त्यांना लोकांमध्ये फूट पाडायची आहे. भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सरकार अस्थिर केले आहे. आमच्याकडे अनेक उदाहरण आहेत. केंद्राच्या सत्तेचे गैरवापर करून निवडून आलेली सरकार पाडणे, मध्यप्रदेश कमलनाथ यांचे सरकार पाडले गेले. सत्तेचा वापर करून महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार कसं पाडलं हे सर्वांना माहित आहे. भाजपकडून केंद्रातील सरकारचा गैरवापर करून अनेक राज्यात ईडीच्या धाक दाखवून सरकार पाडण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

मणिपूरमध्ये दोन समाजात अंतर वाढले की समाज एकमेकांविरूद्ध संघर्ष चालू आहे. पोलिंसावर हल्ले केले जात आहेत. त्यावर केवळ सुरुवातीला तीन मिनीट मोदी बोलले. आणि संसदेत केवळ दहा मिनिटं बोलून हा विषय बाजूला केला. हा विषय त्यांना महत्त्वाचा वाटत नाही. मणिपूरमध्ये स्त्रीयांच्या अब्रुची धिंड काढल्या जातात. याकडे मोदी सरकार केवळ बघ्याची भूमिका आहे. त्यामुळे इंडियाच्या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ.

महाविकास आघाडीत काँग्रेस व ठाकरे गटाचा प्लँन सुरू आहे, याची चर्चा असु शकते, परंतु ती वस्तुस्थिती नाही. माझी आताही तीच भुमिका आहे. असं म्हणत शरद पवार आपल्या भुमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

माझ्या आयुष्यात मी १४ निवडणूका लढलो आहे. मला लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. चिन्हापेक्षा आम्ही प्रामाणिक काम केलं म्हणून हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे मला चिन्हाची चिंता नाही पण सत्तेचा गैरवापर करु नये असं माझं मत आहे. सध्या निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेत नाही. निवडणूक आयोगाने जर स्वत: निर्णय दिला तर मला चिंता नाही. शिवसेनेबाबतच्या निर्णयावर केंद्राने हस्तक्षेप केला होता. त्यामुळे आयोगात ठाकरेंसोबत जे झालं ते आमच्यासोबत देखील होऊ शकतं असेही शरद पवार म्हणाले.

अजित पवार यांच्या गुप्त भेटीवर बोलताना पवार म्हणाले की, पवार कुटुंबात मी वडिलधारा असल्याने माझा सल्ला आजही घेतला जातो. ती गुप्त भेट नव्हती. मी भेटीनंतर काच खाली करून फुले स्वीकारून पुढे गेलो होतो. अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आम्ही राजकीय चर्चा केलीच नाही. माझ्याशी कोण चर्चा करणार आहे. ज्या पक्षात हे सर्व नेते होते त्या पक्षाचा संस्थापक कोण आहे. त्या पक्षाचा वरिष्ठ व्यक्ती कोण आहे. यात आणखी कुणी चर्चा करायला येईल असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्याला कुणीही महत्त्व देण्याचं काहीही कारण गरज नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!