भिवंडी (प्रतिनिधी) : भिवंडी तालुक्यातील गोवे नाका परिसरातील बहुरूपी समाजाच्या वस्तीत भटके बहुरूपी समाज सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिन मंगळवारी समाजातील गरीब विद्यार्थ्यांना वह्यावाटप करीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गोवे नाका येथील जय मल्हार ढाब्यामागे असलेल्या बहुरूपी समाजाच्या वस्तीत स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भटके बहुरूपी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष करणनाथ व्यास, कार्याध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड, सल्लागार अॅड. हणमंत जाधव आदींसह संस्थेचे पदाधिकारी व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मंचावर उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष करणनाथ व्यास यांनी मान्यवर सहकारी-पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने बहुरूपी समाजातील बांधवांना मदत करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सरकारने तसेच इतर समाजातील उच्चशिक्षित बांधवांनीही बहुरूपी समाजातील अज्ञानी बांधवांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. विविध रूपे घेऊन नक्कला करीत दारोदारी फिरणाऱ्या बहुरूपी बांधवांकडे समाजकंटक म्हणून न पाहता त्यांना मदत करण्याची भूमिका समाजाने घ्यावी, असे आवाहन उपस्थितांशी सवांद साधताना व्यास यांनी केले.
तद्नंतर बहुरूपी समाजातील गरीब विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले व महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंदरनाथ राठोड, हजारीनाथ राठोड, लालुनाथ व्यास, मोहननाथ बामणेया, सजननाथ व्यास, हिंदुनाथ व्यास, कैलासनाथ बामणेया यांच्यासह सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.