मुंबई : द ग्लोबल व्हाईट ब्ल्यू टायगर सामाजिक संस्था, श्वेतगंध फाउंडेशन डोंबिवली, ठाणे यांच्यावतीने दिला जाणारा “महाराष्ट्र लोक भूषण पुरस्कार २०२३ ” यंदाच्या वर्षी रांगोळीतून कला सादर करणारे, ज्येष्ठ कलाकार शिवाजी विठ्ठल चौगुले यांना देण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मभूषण नयना आपटे यांच्या हस्ते शिवाजी चौगुले यांना सन्मानित करण्यात आले.
कल्याण चिंचपाडा येथील रहिवाशी असलेले शिवाजी चौगुले हे सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य येथे संचालक डॉ लाळे यांच्याकडे शिपाई पदावर कार्यरत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक विषयावर जनजागृती करीत आहेत. पहिल्यांदाच त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून जाणता राजा ची छबी साकारली. त्यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या कलेची दखल घेऊन आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र सरकार, गुजरात सरकार, गोवा सरकार आणि विविध संस्था संघटनाकडून आतापर्यंत त्यांना २२ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र लोक भूषण पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर त्यांचे सर्वत्रच कौतूक होत आहे. पुरस्काराने भारावून न जाता. यापुढेही शासकीय काम सांभाळत. सामाजिक प्रश्नावर रांगोळीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम अविरतपणे करत राहीन अशी भावना पुरस्कार विजेते शिवाजी चौगुले यांनी व्यक्त केली.