नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर लोकसभेत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. अखेर तिस-या दिवशी मोदीं मणीपूरवर बोलले. मणिपूरवासियांनो, देश तुमच्यासोबत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. महिलांवरील अन्याय सहन केले जाणार नाही, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला.
संसदेत भाषण सुरु झाल्यानंतर दीड तास पंतप्रधान मोदी विरोधकांवर टीकास्त्र, सरकारची ९ वर्षातील कामगिरी यावर बोलत होते. मात्र विरोधक मणिपूरवर बोलण्याची सतत मागणी करत होते. अखेर संतापून दीड तासांनंतर विरोधकांनी सभात्याग करण्याची निर्णय घेतला. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर मोदींनी मणिपूरच्या मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात केली.
मणिपूरबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, अमित शाह यांनी काल सभागृहात मणिपूर हिंसाचारावर सविस्तर माहिती दिली. मणिपूरच्या चर्चेपासून विरोधक पळत आहेत. लवकरच मणिपूरमध्ये शांतता प्रस्तापित होईल. देश मणिपूरच्या लोकांच्या, बहिणींच्या आणि मुलींच्या पाठीशी आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या चर्चेच्या निमंत्रणाला विरोधकांनी सहमती दिली असती तर दीर्घ चर्चा होऊ शकली असती. मणिपूरवर चर्चा करण्यासाठी गृहमंत्र्यांनी पत्र लिहिलं होतं. पण विरोधकांचा हेतू चर्चेचा नव्हता. गृहमंत्र्यांनी मणिपूरमधील परिस्थितीची तपशीलवार माहिती दिली आहे. मात्र तरीही विरोधकांना राजकारणाशिवाय दुसरे काही दिसत नाही, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
राहुल गांधीनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली, असं काल म्हटलं होतं. त्यावर टीका करताना मोदींनी म्हटलं की, सभागृहात भारत मातेबद्दल जे शब्द वापरले गेले, त्यामुळे वेदना झाली. ज्यांनी भारत मातेचे तुकडे केले, ते हे बोलत आहेत, असं मोदींनी म्हटलं. मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. घरं जाळली जात आहेत. महिलांवर अत्याचार होत आहे. मात्र दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मणिपूरमध्ये लवकरच शांतता प्रस्तापित होईल, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास मोदींना मणिपूरवासियांना दिला.
विरोधकांनी इंडियाचे चे तुकडे केले असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या INDIA आघाडीवर टीका करीत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
अधीर रंजन चौधरी निलंबित ..
पंतप्रधान मोदी यांच्याविरोधातील वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबीत करण्यात आले आहे. अधीर रंजन चौधरी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल म्हणाले होते की, धृतराष्ट्र आंधळा होता, तेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. आजही राजा आंधळाच आहे. मणिपूर आणि हस्तिनापूरमध्ये कसलाच फरक नाही. नरेंद्र मोदी नीरव मोदीसारखे शांत बसले आहेत. भाजपाने मणिपूरच्या खासदाराला संसदेत बोलण्याची संधीदेखील दिली नाही.