मुंबई : जळगावातील बालिका हत्याकांड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केल्याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यात लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप पत्रकार महाजन यांनी केला आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीत महाजन किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्रकारांच्या मारहाणीच्या घटनांचे तीव्र पडसाद उमटले असून पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ज्येष्ठ पत्रकार खासदार संजय राऊत यांनी हेच कायद्याचे राज्य का ? असा सवाल उपस्थित केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे लोक अशी मारहाण करत आहेत हे दुर्दैवी असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

जळगावमधील पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात 8 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार आणि हत्येची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरुन संवाद साधत त्यांचे सांत्वन केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सांत्वनाबाबत पत्रकार संदीप महाजन यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर किशोर पाटील यांनी महाजन यांना फोनवरुन शिवीगाळ केली होती. यासंदर्भात ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना ऑडिओ क्लीपबद्दल प्रश्न विचारला. त्यावर, त्यांनी होय ती ऑडिओ क्लीप माझीच आहे, मीच पत्रकाराला शिवीगाळ केलीय, असा खुलासाही त्यांनी केला. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी जे केलं ते सांगायला मागे मागे हटणार नाही, असंही ते म्हणाले होते. हे प्रकरण ताजं असतानाच महाजन यांना भररस्त्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे. रिपोर्टींग करुन घरी जात असताना त्यांना काही जणांनी अडवून त्यांना जबर मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. दरम्यान, आपल्यावर किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कितीही हल्ले झाले तरी आपण आपला लढा सुरुच ठेवणार असल्याचं संदीप महाजन यांनी म्हटलं आहे.

पत्रकारावर हल्ला शिंदे गटाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याचे व्हिडिओ समोर आलेत. तर हे कायद्याचं राज्य आहे का ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे लोक अशी मारहाण करत आहेत हे दुर्दैवी असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रेाहित पवार यांनी मारहाणीचा व्हिडीओ ट्विट करीत सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले की, पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची .का ? तर त्याने विरोधात बातमी छापली. विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे, परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे अशी नाराजीही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!