वाहकाला गावात पाणी मिळाले नाही.. छत्री- निजामपूर एस.टी. बंद केली
ग्रामस्थांचा महाड एस.टी. आगारात संताप
महाड – रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या छत्री- निजामपूर या गावात जाणारी एस.टी.महामंडळाची बस महाड आगारातील वाहतूक नियंत्रकांनी एका वाहकाच्या तक्रारीवरून बंद केल्याचा प्रकार उजेडात आलाय. एका वाहकाला गावात पाणी न मिळाल्याने ही एसटी सेवा बंद केल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट महाड आगारात धाव घेऊन जाब विचारला. यावेळी एसटी कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये काही काळ वाद झाला. अखेर आगारप्रमुखांनी बस सुरु करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण निवळले.
महाड आगारातून महाड रायगड छत्री निजामपूर अशी बससेवा आहे. या बसच्या दिवसातून दोन आणि रात्री एक अशा तीन फेऱ्या होत. रात्रपाळीवर असलेल्या एका वाहकाला गावात पाणी मिळाले नाही म्हणून त्याने तक्रार केली. यावरून वाहतूक नियंत्रकांनी कोणतीच खातरजमा न करता एस.टी. बस छत्री निजामपूर गावात नेणे बंद केले. यामुळे ही बस रायगडवाडी मधूनच परत येवू लागल्याने बावळे, छत्री निजामपूर मधील ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना सुमारे तीन किमीचा डोंगराचा चढ चढून एस.टी.करिता रायगडवाडी येथे यावे लागत होते. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने याचा त्रास सहन करावा लागला. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज महाड आगारप्रमुख कुलकर्णी यांची भेट घेऊन एस.टी. गावात येणे बंद का झाली, अशी विचारणा केली. त्यावेळी वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी वाहक आणि चालक यांनी केलेल्या तक्रारीवरून बंद केलयाचे सांगितले. गेली चाळीस वर्ष गावात येत असलेल्या एस.टी.च्या कोणत्याच कर्मचाऱ्याने आतापर्यंत तक्रार केलेली नाही उलट कर्मचार्यांना गावात पाणी, गरज पडल्यास जेवण, सकाळी गरम पाणी देखील दिले जाते असे असताना अशी तक्रार करणे योग्य नसल्याचे ग्रामस्थ मोरे यांनी सांगितले.
कोणतीच खातरजमा न करता केवळ एका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गावात येणारी बस बंद केली जाते हि खेदाची बाब असून याची चौकशी झाली पाहिजे शिवाय रात्रपाळीच्या गाडीचा प्रश्न होता मग दिवसा येणारी गाडी का बंद केली. असा सवाल सुभाष मोरे यांनी यावेळी केला. यावेळी ग्रामस्थ आपली बाजू मांडत असताना कांही कर्मचारी आत आले आणि त्यानी आपली बाजू जोरदार मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही काळ वातावरण चांगलेच तापले. खातरजमा न करताच गाडी रायगडवाडी पर्यंत नेण्याचे आदेश कोणी दिले याची चौकशी होणे गरजेचे आहे. अन्यथा तालुक्यातील अनेक गावात जाणाऱ्या एस.टी.च्या फेऱ्या खातरजमा न करताच मनमानीपने बंद केल्या जातील असा संतापही ग्रामस्थांनी व्यक्त केला. महाड आगारातील अधिक उत्पन्न देणाऱ्या गाड्या बंद केल्या आहेत. हे निर्णय कोणाच्या आदेशाने घेतले जात आहेत याची चौकशी करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली.