मुंबई : कोविड सेंटर घोटाळयाप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह पालिकेतील दोन वरिष्ठ अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोव्हिड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप पेडणकरांवर केला जात आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई महापालिकेने करोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत होता. कोव्हिड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याची तक्रार अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडे करण्यात आली होती. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६ हजार ८०० रुपयांना खरेदी केल्याचं आरोप तत्कालीन विरोधी पक्षाने केला होता. हे कंत्राट तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप झाला होता.
या प्रकरणाची चौकशी करणार्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल झाल्याने मुंबईतील आग्रीपाडा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.