दिल्ली : संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ‘मोदी आडनाव’ यावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी सूरतच्या कनिष्ठ न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सूरत न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली होती. राहुल गांधींना दोषी ठरवण्याचा सूरत न्यायालयाच्या निकालाला आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर देशातील तसेच राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांना सुरत येथील कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ते लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरले होते. लोकसभा सचिवालयाने एक आदेश जारी करून राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाल्याच्या कारणावरून संसदेचे सदस्यत्व रद्द केले होते. खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांना मिळालेलं सरकारी निवासही सोडावं लागलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल गांधी यांना पुन्हा निवासस्थानही मिळणार का अशी चर्चा रंगली आहे.

राहुल गांधी यांना सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. गुजरातच्या कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा सुनावली होती. त्यानंतर गुजरात हायकोर्टाने तो निर्णय कायम ठेवला होता. अखेर सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. राहुल गांधींच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत शिक्षेला स्थगिती दिली असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या जास्तीच्या शिक्षेवरही सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राहुल गांधी, काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षांच्या आघाडीच्या दृष्टीने अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.

‘यह नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत हैं’

मोदी आडनाव प्रकरणी मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसनं ट्विट केलं आहे. ‘यह नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत हैं’, अशी पोस्ट काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आली आहे.

काँग्रेसचा राज्यभर मिठाई वाटून जल्लोष*

काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आनंद व्यक्त केला. तसेच राज्यभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटत जल्लोष केला. हा सत्याचा विजय आहे. देशात हुकुमशाही व मनमानी कारभार सुरु असून या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डगमगता उभी आहे. राहुलजी यांच्यावर खोट्या तक्रारीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचे काम झाले होते पण देशात आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे. राहुलजी गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक असल्याची प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!