ठाणे: समृध्दी महामार्गावर पुन्हा भयानक दुर्घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळील खुटाळी गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन व गर्डर कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला असून, ३ कामगार जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री १२ वाजता ही घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताच्या आठवणी ताज्या असताना समृद्धी महामार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळ ही घटना घडली. समृध्दी महामार्गावर शहापूर जवळील सरलंबे गावाजवळ ब्रीजचे काम सुरू होते. या ठिकाणी एकूण १७ कामगार आणि ९ इंजिनिअर काम करत होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास पुलाचे काम सुरू असतानाच अचानक त्यावरील ग्रेडर आणि मशिन खाली कोसळली. ही क्रेन कामगारांच्या अंगावर कोसळल्याने त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर अनेक कामगार अडकले गेले. जखमींना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल व शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफ ची टीम व अग्निशमन सह इतर टीम उपस्थित आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व महसूल प्रशासन घटनास्थळी उपस्थित आहेत. स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या क्रेन व ग्रेडर खाली किती जण दाबले गेले आहेत, हे संपूर्ण ग्रेडर बाजूला केल्यावर समजले. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्रयांकडून दु:ख व्यक्त

या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. मंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्रयांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

आज मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एन डी आर एफ चे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!