ठाणे ( अविनाश उबाळे ) : वासिंद शहरातील रस्त्याची दैनअवस्था झालेली असतानाही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी एकत्र येत घमेली, फावडी हातात घेऊन श्रमदान करीत वासिंद शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे स्वतः बुजवून बांधकाम विभाग प्रशासनाच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला. वासिंदकर तरुणांच्या या अनोख्या गांधीगिरी आंदोलनाने शहापूर तालुक्यात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
वासिंद शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. वासिंदच्या काही जागृत नागरिकांनी वासिंद मध्ये पडलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती तसे लेखी निवेदनही देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे परंतु शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे देखभाल दुरुस्ती काम करण्याकडे दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यात हा रस्ता पुर्णत उखडुन उध्वस्त झाला आहे असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर डांबरच राहीली नसल्याने येथे सर्वत्र खड्डे पडले आहेत. पावसाळ्या अगोदर साधी डागडुजी देखील करण्याकडे प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष केल्याचा आरोप वासिंदकर तरुणांनी केला आहे. प्रचंड दैनअवस्था झालेल्या या रस्त्यावरुन वाहने नेतांना चालकांना देखील मोठी कसरत करावी लागत आहे.दुरवस्था झालेल्या या रस्त्यावर अनेक दुचाकी घसरुन अपघात होत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्या अगोदर रस्त्याची वेळीच दुरुस्ती का केली नाही ? असा सवाल संतप्त वासिंदचे नागरिक आता बांधकाम प्रशासनाला विचारत आहेत.
रविवारी वासिंद मधील तरुणांनी पुढाकार घेत एकत्र येत स्वतः रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी पडलेले खड्डे काँक्रीट मिक्स ने भरले व रस्त्याची डागडुजी केली. हे अनोख्या आंदोलन करताना या तरुणांनी शहापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला वासिंद शहरात रस्त्यावर ठिकाणी खड्डे पडलेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधी पुढाऱ्यांच्या विरोधातही संतापाच्या भावना व्यक्त केल्या.
वासिंद शहरातील तरुण उद्योजक अनिल मानिवडे यांनी रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी आर एम सी मटेरियल देण्यासाठी पुढाकार घेतला तर निलेश काठोळे, सागर पाटील,सागर कंठे, अविनाश शेलार,संतोष काठोळे ,राजेंद्र भेरे, अनिस सय्यद ,सौरभ पाटील ,मुकेश दामोदरे, मनोहर सासे,सुभाष पाटील, सुनील जगताप, कृष्णा शेलार,अमोल गोरले, मधुकर गायकर ,काळूराम पवार, आधी तरुणांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येत खड्डे भरण्यासाठी पुढाकार घेतला. वासिम खड्डे मुक्त केले. तरुणांच्या या अनोख्या गांधीगिरीच्या मार्गाने केलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चपराक बसली असून बांधकाम प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची वेळीच डागडुजी का करण्यात आलेली नाही यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी शहापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता बळवंत कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.