मुंबई : विधान भवनात वाढत्या गर्दीचा आमदारांना त्रास होत असल्याचा मुद्दा सदस्यांनी आज सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी खळबळजनक माहिती सांगितली. एक हजार रुपयात अधिवेशनाचा तात्पुरता पास तर १० हजार रूपयात कायमस्वरूपी पास मिळत असल्याची माहिती सभागृहात दिली. विधानभवनात दलाल फिरत असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही दरेकर यांनी केली.
सदस्य विक्रम काळे यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशन च्या अनुषंगाने हा मुद्दा उपस्थित केला होता. विधान भवनात अनेकजण मोकाटपणे फिरत असल्याचे निदर्शनास येत असून, गर्दीमुळे आमदारांना खूपच त्रास होत असल्याचे काळे यांनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले. सदस्य अनिल परब यांनी स्वच्छ्ता आणि पाणी पुरवठा मंत्र्यांच्या दालनाशेजारी असलेल्या स्वच्छ्तागृहातील अस्वच्छता आणि वाया जाणारे पाणी याकडे लक्ष वेधले. तसेच कॅन्टीनमध्ये आमदारांना बसायलाही जागा मिळत नसल्याच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
उपसभापती निलम गोऱ्हे यांनी स्वच्छतागृहसंदर्भात तातडीने दखल घेण्याचे निर्देश दिले. तसेच कॅन्टीनसंदर्भात बुधवारी दुपारी बैठक घेऊन सुचना देण्यात येणार असल्याचे सांगितले. अधिवेशनाच्या पूर्वी बैठकीत स्वच्छता गृह आणि कॅटीन संदर्भात सुचना दिल्या जातात असेही गो-हे यांनी यावेळी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षांकडून पासेस थांबविण्यात आले आहेत. तरीसुध्दा अनेक मंत्रयांनी माझयाकडे पासेस मिळावेत म्हणून विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अधिवेशनाच्या पासेससंदर्भात कडक कारवाई करण्यात येईल असेही गो-हे यांनी स्पष्ट केले.