सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप
अविनाश उबाळे
ठाणे : शहापूर शहरातील आसनगाव, पार्थसारथी पेट्रोल पंप ते पंडीत नाका ते किन्हवलीकडे जाणाऱ्या मार्गावरील मुख्य रस्त्याची पावसाळ्यात अक्षरशः चाळण झाली आहे. पाऊस आला धाऊन आणि डांबर गेले वाहून अशी भयानक स्थिती या रस्त्याची सध्या दिसत आहे. रस्त्यावर फक्त खडी व दगड गोठेच उरलेला हा रस्ता शेकडो लहान मोठ्या खड्डयांनी व्यापला आहे.या खड्यांत पाण्याची तळी साठली आहेत असे चित्र दिसत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाच्या भोंगळ कारभाराविरोधात सोमवारी शहापुरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येत रस्त्यावरील खड्ड्यात बसून बांधकाम विभाग प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रश्मीताई निमसे, अमोल अंदाडे, महेश धानके, दत्ता पाटील , दत्तात्रय विशे यांच्यासह शेकडो शहापूरकर नागरिक मोठ्या संख्येने या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे तब्बल अर्धा तास किन्हवली शहापूर हा मार्ग आंदोलकांनी रोखून धरल्याने तब्बल अर्धा तास शहापूर किन्हवलीकडे जाणारी वाहतूक ठप्प पडल्याने या मार्गावर वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
खराब झालेल्या या रस्त्यावरुन वाहने नेतांना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर अनेक दुचाकी घसरुन अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीसीने पावसाळ्या अगोदर रस्त्याची वेळीच दुरुस्ती का केली नाही ? असा सवाल संतप्त शहापूरातील नागरिक बांधकाम प्रशासनाला विचारत आहेत.
शहापूर पोलीस व तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तात्काळ आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेत आंदोलकांना शांत करीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली यावेळी आंदोलकांनी शहापूरचे नायब तहसीलदार देवाजी चौधरी यांना रस्त्या संदर्भातील तक्रारीचे लेखी निवेदन दिले. शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे देखभाल दुरुस्ती काम करण्याकडे दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यात हा रस्ता पुर्णत उखडुन उध्वस्त झाला आहे असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.पावसाळ्यात रस्त्यावर डांबरच राहीली नसल्याने येथे सर्वत्र खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांची पावसाळ्या अगोदर साधी डागडुजी देखील करण्याकडे प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे यांनी केला आहे.