अलिबाग,दि. २३ :- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी येथे भूस्खलनाची घटना बुधवारी (१९ जुलै) रात्री उशीरा घडली होती. बुधवारी रात्री दरड कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २० जुलैपासून वाडीत बचावकार्य सुरू झालं होतं. ते आज चौथ्या दिवशी (२३ जुलै) सायंकाळी सायं. ५.३० वाजता थांबवण्यात आल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. इर्शाळवाडी दुर्घटनेतून बचावलेल्या १४४ लोकांच्या पाठिशी शासन ताकदीने उभे आहे. या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्हातील अन्य धोकादायक वाड्या आणि गावांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
इर्शाळवाडी येथील बचाव कार्याचा आढावा व पाहणी संदर्भात खालापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ.महेश बालदी, आ.महेंद्र थोरवे, विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, विशेष पोलीस निरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, दि.१९ जुलै २०२३ रोजी इरर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळल्याने या आदिवासीवाडीतील ४३ घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली असून इरर्शाळवाडीतील २२८ इतकी लोकसंख्या होती. यापैकी या दुर्घटनेत २७ लोक मृत्यूमुखी, ५७ लोक बेपत्ता असून १४४ लोक हयात आहेत. या हयात असलेल्या लोकांचे तात्पुरत्या जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत..
या कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित करून सिडको मार्फत सदर जागेचा विकास करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच आ.महेश बालदी यांनी विधानसभेत आयुधाद्वारे दिलेल्या माहितीनुसार ५ वाड्यांचे आणि जिल्ह्यातील २० धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
या दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफर, इमॅजिका कामगार, सिडकोचे कर्मचारी तसेच इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनधी असे एकूण जवळपास १ हजार १०० लोकांनी उत्तमरित्या कामे केले त्यांचे शासनामार्फत आभार मानले. भविष्यात अशी दुर्देवी घटना घडू नये म्हणून शासन व जिल्हा प्रशासन खबरदारी घेईन, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. याठिकाणी काही ट्रेकर्स, पर्यटक, काही लोक येथील झालेली घटना बघण्यासाठी येण्याची शक्यता आहे. याठिकाणी जिल्हा प्रशासनाने १४४ कलम लागू केले आहे. तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
०००