मुंबई : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पालकमंत्री नागरिक कक्ष कार्यालय सुरू करण्यात आल्याने त्याला शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेत विरोध दर्शविला आहे. ही प्रथा चुकीची आहे. मंत्र्यांचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार वेगळे असतात. त्यामुळे येत्या २४ तासात हे कार्यालय खाली करा असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिकेतील सर्व पक्ष कार्यालय आणि समिती कार्यालय अनेक महिन्यापासून बंद आहेत. पक्ष कार्यालय बंद असताना बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पालकमंत्री म्हणून कार्यालय बनवण्यात आले आहे. मुंबई महापालिकेत मुख्यालयात एक बाजार समितीची केबिन आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षांची केबिन ही दोन पालकमंत्र्यांना दिली आहे.एकीकडे पक्ष कार्यालय बंद असताना पालकमंत्र्यांसाठी महानगरपालिकेत कार्यालय कशाला?, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक स्वराज्यांचे हक्क मानले जात नसतील तर माझी पण एक मागणी राहील की महराष्ट्रातील प्रत्येक महापौरांना मंत्रालयात ऑफिस दिले गेले पाहिजे. मुंबईचे आमदार म्हणून आम्हाला देखील एक-एक ऑफिस दिले गेले पाहिजे. मी देखील पालकमंत्री असताना अनेक बैठका घेतल्या. मात्र मी कुठे ऑफिस बनवले नाही. अधिकाऱ्यांना परवानगीने मी बैठका घेतल्या. मी कुणाचे दालन हडपले नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, एक वर्ष झाले मात्र निवडणुका घेण्याची हिंमत नाही. कुठेही लोकप्रतिनिधी नाही. महापौर नाही, कमिटी चेअरमन नाही. अशावेळी अजून घोटाळे करायला पालकमंत्र्यांना ऑफिस देण्यात येत आहे. काल या ऑफिसमध्ये पालकमंत्री नाहीत तर भाजपचे माजी नगरसेवक बसले होते. हुकुमशाही पद्धतीने हे घुसखोर तिथे जात आहेत. हे जर २४ तासात थांबले नाहीत तर मुंबईकर तिथे राग व्यक्त करतील मग कुणाला जबाबदार धरायचं मला माहिती नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.