मुंबई, दि. २१ : शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय अहिरे यांनी केले आहे.
मुंबई व मुंबई उपनगरातील बहुतांशी प्रवाशांची वाहतूक ही काळी पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षा मधून होत असते. वाहतुकीदरम्यान प्रवाशांशी गैरवर्तन, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांविरोधात तक्रारी प्राप्त होत असतात. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि तक्रार करण्यास अडचणी येऊ नयेत यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वरील व्हॉट्सॲप क्रामकावर मेसेज, फोटो किंवा ई-मेलद्वारे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. कॉल स्वीकारले जाणार नाहीत. तक्रारीमध्ये वाहन क्रमांक, ठिकाण, वेळ, थोडक्यात तक्रारीचे स्वरूप, तक्रारदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी नमूद करण्यात यावा. संबंधित दोषी चालकांवर मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले आहे.