मुंबई, दि. 18 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कामकाजाबाबत चौकशी करण्यासाठी शासनस्तरावरून चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन कुलगुरूंना खुलासा सादर करण्यास कळविण्यात आले होते. त्यानुसार आलेल्या खुलाशाच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी सदर प्रकरण कुलपती म्हणून राज्यपाल यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. राज्यपालांकडून अहवालाच्या आधारे कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य प्रवीण दटके यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री पाटील म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिक्षांचे निकाल उशिरा लावणे तसेच अन्य अनियमित कामकाजाबाबत चौकशी समिती गठित करण्यात आली होती. एमकेसीएलला निविदा प्रक्रियेशिवाय दिलेल्या कामाचा अहवाल देखील राज्यपालांकडे देण्यात आला आहे. राज्य शासनाकडून कुलगुरूंवर कारवाई करता येत नाही. राज्यपालांकडून कुलगुरूची नियुक्ती करण्यात येते त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे अधिकार राज्यपालांना आहेत. त्यामुळे शासनाने गठीत केलेल्या समितीचा अहवाल राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. राज्यपालांकडून कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच याव्यतिरिक्त अन्य बाबी असल्यास समिती नेमण्यात येईल आणि त्याची चौकशी करून राज्यपालांना अवगत करण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, सतीश चव्हाण यांनी सहभाग घेतला.

शासकीय वसतिगृहांतील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार

सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर झालेला अत्याचार आणि हत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून जिथे त्रुटी आहेत त्याची पूर्तता करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे सावित्री बाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर झालेला अत्याचार आणि हत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर कोणकोणत्या उपायोजना केल्या जात आहेत याबाबत विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. मंत्री पाटील म्हणाले की, सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीना शासकीय वसतिगृह वांद्रे येथे स्थलांतरित केले जाईल. राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व सदस्यांकडून आलेल्या सूचनांवर कार्यवाही केली जाईल.महिला वसतिगृहात महिला वॉर्डन नेमणे, सुरक्षा मंडळातील व सैन्यदलातील निवृत्त सैनिकांनादेखील सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त करणे याबाबत निर्णय घेण्यात येईल. सर्वत्र सीसीटीव्ही यंत्रणा सर्वत्र बसवण्यात येईल. मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात ही घटना घडली, तेथील वसतिगृह अधिक्षिका यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या घटनेची चौकशी करण्यासाठी समितीदेखील नेमण्यात आली आहे. महिला वसतिगृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आलेल्या सर्व सूचनांवर कार्यवाही करून लवकरात लवकर त्रुटी दूर करण्यात येतील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. या लक्षवेधीच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री विक्रम काळे, सचिन अहिर, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे, डॉ.मनीषा कांयदे यांनी सहभाग घेतला. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महिला दक्षता समिती स्थापन करण्याची सूचना केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!