मुंबई, दि. १८ : शिक्षकांच्या परीक्षा पूर्ण झाल्या असून, गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. शिक्षकांच्या भरती प्रक्रियेवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती आदेश दिला होता. मात्र तो उठविण्यात आला आहे. त्यामुळे यापुढील काळात दोन टप्प्यात शिक्षकांची भरती होणार आहे, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. त्याचबरोबरच जिल्हा परिषदेमार्फत शिक्षकांची थेट नियुक्ती केली जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
आधार कार्ड लिंक होत नसल्यामुळे राज्यात रखडलेल्या शिक्षक भरतीकडे कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेचे लक्ष वेधले. त्यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरती थांबलेली नसून, लवकरच भरती होणार असल्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारने जिल्हा परिषदेला रोस्टर चेक करून शिक्षकांची अंतिम आकडेवारी कळविण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक जिल्हानिहाय अंतिम यादी आल्यानंतर, शिक्षकांना चॉईस दिला जाईल. त्यानुसार त्या श्रेणीनुसार शिक्षकांना जिल्ह्यांची निवड करण्यात येईल. माध्यमिक शाळांमध्ये भरतीवेळी मुलाखती घेतल्या जातात. राज्य मंत्रिमंडळाने पूर्वीच्या १० ऐवजी केवळ ३ उमेदवारांची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काही जणांनी न्यायालयात दाद मागितली आहे. परंतु, प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेमार्फत थेट नियुक्तीपत्रे दिली जातील, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
**