मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली होती. आजच्या अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. नीलम गोऱ्हे यांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र लिहिलं आहे. तसेच आमचा नीलम गोऱ्हेंवर विश्वास नाही, त्यांना नैतिक दृष्ट्या पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. दरम्यान नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटवण्याची राज्यपालांकडे मागणी करण्यात आली आहे. मविआच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली, अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली आहे.
विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अपात्रतेच्या नोटीसीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, अशा प्रकारे बेकायदेशीर रित्या मुद्दा उपस्थित करत सभागृहाला वेठीस धरता येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या विरोधात विरोधकांनी सभात्याग करत सरकारच्या दडपशाहीचा विरोध केला. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासोबतच विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे व विप्लव बाजोरीया यांच्याविरोधीतअपात्रतेसाठी ठाकरे गटाकडून पत्र देण्यात आले आहे. नीलम गोऱ्हेंविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने अपात्रतेची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे त्या सभागृहाचे कामकाज करू शकत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आमच्या नीलम गोऱ्हेंवर विश्वास नाही, त्यांना नैतिक दृष्ट्या पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.