मुंबई : विधिमंडळात पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा स्थगन प्रस्ताव मांडला. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव फेटाळला. शेतक-यांच्या प्रश्नावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळल्यानंतर विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर विरोधी पक्षाने सभात्याग केला. थोरातांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी थोरात- फडणवीस आमने सामने आले होते.
अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्रयांची ओळख सभागृहाला करून दिली त्यानंतर विधिमंडळाच्या कामकाजाला सुरूवात झाली. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी शेतक-यांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, राज्यात वादळामुळे यावर्षी उशिराने मान्सुनला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत राज्यातल्या अनेक भागांमध्ये पन्नास टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर असून, शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. याबाबत सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्याला धीर देण्यासाठी दक्ष राहून मदतीच्या उपाययोजना करायला हव्या त्या केल्या जात नाही. आपल्या राज्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र १ कोटी ४२ लाख आहे पण त्यातून केवळ ६८ लाख हेक्टर क्षेत्रापर्यत म्हणजे ५० टक्क्यापर्यत पेरण्या झालेल्या आहेत. कोकण विभागात केवळ १६.३० टक्के तर पुणे विभागात केवळ ३० टक्के पेरणी झालेली असून राज्यातील अनेक भागात पाऊस नसल्याने पेरणीला वेग आलेलाच नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे.
राज्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली असलली तरी पावसाचा जोर कमी असल्याने पुरेशी ओल जमिनीत तयार झालेली नव्हती. पेरण्या उशिरा होतील या भीतीपोटी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या परंतु त्यानंतर किरकोळ पाऊस झाला आणि प्रखर उष्णतेने रेापे कोमेजली आणि सोयाबीन, कपाशी व मक्याची पिके जळून दुबार पेरणीची वेळ आली. खानदेश, बुलडाणा व वाशिम, परभणी, हिंगोली औरंगाबाद तसेच नगर पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे. दुबार पेरणीसाठी पुन्हा बियाण्याचे संकट शेतकऱ्यासमोर उभे राहिले आहे. मात्र राज्यातील अनेक भागात पाऊस नसल्याने पेरण्यांना वेग येत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला, असेही थोरात म्हणाले.
कमी पर्जन्यमानाच्या तालुक्यांमध्ये तर सुरुवातीला पेरण्या झाल्या परंतु नंतर पाऊसच न पडल्यामुळे दुबार आणि तिबार पेरण्यांमुळे शेतकरी आज कोलमडून पडलेला दिसतो आहे. मागील वर्षी अतिवृष्टी व वळवाचा पाऊस आणि उन्हाळ्यात झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाई जाहीर करुनही शासनाने दिलेली नाही. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वनकुटे गावांत स्वत: मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाहणी करुन अद्याप मदतीचे वाटप झालेले नाही. गरज पडली तर शेतकऱ्यांना, बियाणे खते मोफत उपलब्ध करुन देण्याची उपाययोजना आखणे गरजेचे आहे. मात्र त्यावर अजून साधी चर्चाही सत्ताधारी नेते, कृषी विभागाचे अधिकारी करत नाहीत, असेही थोरात म्हणाले.
बोगस बी बियाणे; सरकारच्या टोळ्या मात्र वसुली करतायत
बी बियाणे आणि खतांची परिस्थिती राज्यात गंभीर झालेली आहे. बोगस बियाणे बाजारात मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात कारवाया करून शेतकऱ्यांना धीर द्यायचे सोडून सरकारच्या काही टोळ्या जिल्ह्यांमध्ये वसुली करत फिरत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघायला सरकारला वेळ नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप याच सरकार व्यस्त आहे. त्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात त्यामुळे शेतकऱ्याच्या दारात सरकार कधी जाणार? शेतकऱ्याचे संकट कधी समजून घेणार असा संतप्त सवाल ही आ. थोरात यांनी केला.
सरकार शेतक-यांच्या पाठीशी ठामपणे उभे : देवेंद्र फडणवीस
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देताना म्हणाले की, विरोधी पक्षाने जो प्रश्न उपस्थित केला त्याचे शासनाला गांभीर्य आहे. राज्यात पाऊस कमी आहे, याचा आढावा आम्ही कालच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. राज्यात काही भागात पाऊस कमी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे नाशिक विभागात पेरण्या कमी झाल्या आहेत. आयएमडीचा अहवाल सरकारला प्राप्त झालाय येत्या आठवडाभरात चांगला पाऊस दाखवला आहे. पेरण्या होऊ शकल्या नाहीत. दुबार पेरणीची वेळ आली तर सरकारने नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून तसा आराखडा सुद्धा तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत १० हजार कोटीहून अधिकची मदत देण्यात आली आहे. बोगस बियाण्यांविरुद्ध कायदा अधिक कठोर करण्याचा निर्णय कालच घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांची काळजी केवळ विरोधकांनाच आहे, असा आव त्यांनी आणू नये. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.